19 November 2019

News Flash

जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या ‘संजय भाऊ सॉरी’ या बॅनर मागील सत्य

'संजय भाऊ आय अॅम सॉरी' अशा फलकाचा फोटो व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला होता.

‘संजय’ भाऊ आय अॅम सॉरी आणि पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेल्या फलकाची पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु, वायरल झालेला फलकाचा फोटो बनावट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजपाच्या एका नगरसेवकाने फलक लावणाऱ्या व्यक्तीवर पत्रकाद्वारे पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र फलकच लागले नसल्याने त्यांची मात्र पंचाईत झाली आहे. त्यामुळे हा बनावट फोटो कोणी तयार केला आणि राजकीय वर्तुळात चर्चा कोणी घडवून आणली याचा शोध वाकड पोलीस घेणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, भाजपाच्या एका नगरसेवकाने ‘संजय भाऊ आय अॅम सॉरी’ आणि पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असलेले फलकाचा फोटो व्हाट्सअॅपवर व्हायरल केला. त्यानंतर सर्वत्र या फोटोची चर्चा सुरू झाली. परंतु, त्यांनी पाठवलेला फोटो हा बनावट खोटा असल्याचा संशय आल्याने लोकसत्ता ऑनलाईननं याची पडताळणी केली. यामध्ये संबंधित ठिकाणी अशा प्रकारचा कोणताही फलक नसल्याचे समोर आले आहे. शिवाय गेले काही दिवस तिथे कोणतीही जाहिरात लावण्यात आली नसल्याची माहितीही मिळाली आहे.


पिंपळे सौदागर येथील स्पॉट १८ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलक लागल्याचे सांगण्यात आले. याची पडताळणी करण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी अशाप्रकारचा कोणताही फलक नसल्याचं समोर आलं. तसंच तेथील व्यवसायिकांशी संवाद साधला असता व्हायरल होणाऱ्या फलकासारखा कोणताही फलक किंवा अन्य जाहिरात त्या ठिकाणी लावली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा खोडसाळपणा कोणी केला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वाकड पोलीस या घटनेकडे कसे पाहतात हे देखील पाहावे लागणार असून त्या व्यक्तीचा शोध घेणार का हे बघावे लागेल.

First Published on November 7, 2019 8:41 am

Web Title: pune shiv sena sanjay raut cm devendra fadnavis banner is fake jud 87
Just Now!
X