तापमान पुन्हा चाळिशीपार; राज्यात वादळी पावसाचा अंदाज

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुण्यातही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून, त्यापूर्वी कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने पुणेकर घामाघूम होत आहेत. शहरात गुरुवारी ४०.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. लोहगावचा पारा ४१ अंशांच्या पुढे गेला. त्याचप्रमाणे किमान तापमानही वाढल्याने रात्रीच्या उकाडय़ात वाढ झाली आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून शहरात तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर कमाल आणि किमान तापमानात किंचित चढ-उतार झाले. मात्र, अनेक दिवस कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहिला. गुरुवारी कमाल तापमान ४१ अंशांच्या आसपास पोहोचले असून, सरासरीच्या तुलनेत हे तापमान तब्बल ३.१ अंशांनी अधिक आहे. किमान तापमानही २० अंशांच्या आसपास आले असल्याने रात्रीही उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार १२ एप्रिलला शहरात सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे. १३ आणि १४ एप्रिलला विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल. १५ आणि १६ एप्रिललाही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दरम्यान तापमानात काहीशी घट होण्याचाही अंदाज आहे.

पावसाच्या शक्यतेपूर्वी राज्यातही तापमानवाढ कायम आहे. विदर्भात आणि मराठवाडय़ात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. चंद्रपूरमध्ये गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती, वर्धा या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. ब्रह्मपुरी, नागपूर आदी ठिकाणी ४३, तर इतर सर्वच ठिकाणी कमाल तापमान ४० ते ४१ अंशांच्या पुढे आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेड, तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर, जळगावात तापमानाचा पारा ४३ अंशांपुढे गेला आहे.