आणखी ३०० ई-चलन यंत्रे दाखल

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंडाची रक्कम गोळा करणारे आणि रक्कम घेऊन वाहनचालकांच्या हातात दंडाची पावती देणारे वाहतूक पोलीस हे चित्र कालबाहय़ होणार आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे तीनशे ई-चलन यंत्रे दाखल झाली आहेत. त्यामुळे या पुढील काळात वाहतूक पोलिसांचा कारभार कागद आणि रोकडरहित होणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गेल्या महिन्यात ७ एप्रिलपासून ई-चलन यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडाची रक्कम घेण्यासाठी शहरातील विविध चौकांत नेमण्यात आलेल्या वाहतूक पोलिसांना इम्पॉस हे डिजिटल उपकरण देण्यात आले आहे. ७ एप्रिलपासून वाहतूक पोलिसांना दोनशे ई-चलन यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. या उपकरणाचा वापर करून आतापर्यंत ५३ हजार १०७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी आणखी तीनशे यंत्रे वाहतूक पोलिसांकडे दाखल झाली आहेत. पोलीस आयुक्तालयात बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते तीनशे यंत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम उपस्थित होते. कार्यक्रमात स्पार्कन आयटी सोल्युशन्स कंपनीचे संचालक राजेंद्र काणे यांचा सत्कार करण्यात आला. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी प्रास्ताविक केले. सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी आभार प्रदर्शन केले.

दंड आकारण्याची पावतीपुस्तके जमा

पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे पाचशे ई-चलन यंत्रे दाखल झाली आहेत. ही यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले आहे. नियमभंग करणाऱ्या वाहचालकाच्या गाडीचा क्रमांक, छायाचित्र ही माहिती या यंत्रात भरणे शक्य होते. दंडाची रक्कम डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तसेच ऑनलाइन भरण्याची सोय करण्यात आली आहे. ज्या वाहनचालकाकडे कार्ड नसेल त्याला नजीकच्या व्होडाफोन स्टोअरमध्ये जाऊन दंडाची रक्कम भरता येईल. वाहनचालकाने पैसे भरल्यानंतर त्वरित त्याच्या मोबाइलवर पैसे भरण्यात आल्याचा संदेश पाठवण्यात येईल. ई-चलन यंत्रणेमुळे वाहतूक पोलिसांचा कारभार कागद तसेच रोकडरहित होईल. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. वाहतूक पोलिसांना दंड आकारण्यासाठी देण्यात आलेली पावतीपुस्तके कालबाहय़ ठरणार आहेत.