पुणे विद्यापीठामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘स्वच्छ’ या संस्थेला बाहेरचा रस्ता दाखवून टेंडर्सच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे.
पुणे विद्यापीठामध्ये ‘स्वच्छ’ या स्वयंसेवी संस्थेचे कचरावेचक कचऱ्याचे व्यवस्थापन करतात. गेली सोळा वर्षे ही संस्था विद्यापीठामधील कचऱ्याचे व्यवस्थापन करत आहे. रोज साधारण १३० स्वयंसेवक विद्यापीठातील एक टन कचऱ्याची विल्हेवाट लावतात. याशिवाय झाडणे, हाउसकिपिंग, कम्पोस्टिंग या सुविधाही ही संस्था देते. मात्र, विद्यापीठाने या संस्थेला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे विद्यापीठातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून संस्थेची निवड करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटी आहे आणि जी कंपनी पाच लाख रुपये अनामत रक्कम ठेवू शकते, त्या कंपन्याच टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. कामासाठी घेतले जाणारे सेवाशुल्क आणि सदस्यांची वर्गणी यातून स्वच्छचे कामकाज चालते. त्यामुळे विद्यापीठाने निश्चित केलेले निकष पूर्ण करून टेंडर प्रक्रियेमध्येही स्वच्छ सहभागी होऊ शकत नाही.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या १३० कचरावेचकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. जे काम ‘स्वच्छ’ करते, त्या पेक्षा कोणत्या वेगळ्या सेवा खासगी कंपनी देणार आहे, असा प्रश्न संस्थेकडून विचारला जात आहे.
‘स्वच्छ’च्या कामावर विद्यापीठामध्ये तक्रारी नाहीत. स्वच्छचे काम सुरळीत सुरू आहे, असे असतानाही विद्यापीठातील काही घटकांच्या हितसंबंधामुळे टेंडर प्रक्रिया राबवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे,’ असा आरोप विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी केला आहे.