पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी सिंहगड कॅम्पसची सीमा भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला. तर पाचजण या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतून बचावलेल्या राणी ठाकरे या महिलेने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. राणीने सांगितले, मी आणि माझे पती छत्तीसगढ येथील आहोत. माझे पती पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात कामानिमित्त आले. त्यांना काम मिळाल्याने मला फोन करून त्यांनी पुण्यात येण्यास सांगितले. इथे येऊन मलाही आठवडा झाला. सगळं काही ठीक चाललं होतं. मध्यरात्री सगळेच झोपले होते. तेवढ्यात बाहेर जोरात आवाज आला. आम्ही धावत गेलो तर वाचवा वाचवा असे ओरडत मजूर आमच्यासमोर ओरडत होते. अंधार खूप होता त्यामुळे काहीच करता आले नाही.

या घटनेत माझ्या दोन दिरांचा मृत्यू झाला, हे सांगताना या महिलेला अश्रू अनावर झाले. पुण्यातील आंबेगावमध्ये असलेल्या सिंहगड कॅम्पस सीमा भिंतीपासून काही अंतरावर एका इमारतीचे काम सुरू होते. त्या कामासाठी आलेल्या मजुरांना पत्र्याच्या २० तात्पुरत्या शेड्स उभारून देण्यात आल्या होत्या. रविवार, सोमवार या दोन्ही दिवशी पुण्यात चांगलाच पाऊस झाला. यामुळेच सिंहगड कॅम्पसची भिंत खचली आणि या २० शेड्सवर कोसळली. ज्या दुर्घटनेत ६ मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या घटनेमुळे शनिवारीच पुण्यात झालेल्या भिंत दुर्घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली. या दुर्घटनेतून बचावलेल्या राणी ठाकरे यांचे दोन दीर या घटनेत मरण पावले. वाचवा वाचवा हा आवाज अजूनही कानात घुमतोय असं राणीने सांगितले.