मेट्रोच्या माहिती केंद्राला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मेट्रो कधी धावणार, डब्यांची रचना कशी असेल, मेट्रोला किती डबे असतील, किती प्रवासी त्यातून एकावेळी प्रवास करू शकतील, उन्नत मार्गावरील स्थानकांची रचना कशी असेल आदी प्रश्नांपासून ते आमच्या भागात मेट्रो येणार का? मेट्रो भुयारी मार्गातून कशी जाणार असे नानाविध प्रश्न महामेट्रोच्या माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांना विचारण्यात येत आहेत. पुणेकरांच्या मनातील मेट्रोबाबतच्या शंकांचे योग्य निरसन होत असल्यामुळे मेट्रो प्रकल्पाबाबतची उत्सुकताही वाढली असून मेट्रो माहिती केंद्राला पुणेकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोशनकडून (महामेट्रो) सुरू झाली आहेत. येत्या २०२१ पर्यंत या दोन्ही मार्गिकांची कामे पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोने केला आहे. मेट्रोचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर या प्रकल्पाबाबत पुणेकरांच्या मनातही उत्सुकता आणि काही शंकाही निर्माण झाल्या आहेत.

नागरिकांच्या शंकांचे निराकरण व्हावे, मेट्रो प्रकल्पाची इत्थंभूत माहिती त्यांना मिळावी यासाठी नागपूर मेट्रोच्या धर्तीवर बालगंधर्व रंगमंदिर परिसरात मेट्रो माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर आठवडाभरातच साडेचार हजार नागरिकांनी या केंद्राला भेट दिली. या आकडेवारीवरूच या केंद्राला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या माहिती केंद्राला महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक, विदेशी पर्यटक तसेच पालक त्यांच्या मुलांसह भेट देत आहेत. दिवसभरात चारशे ते साडेचारशे नागरिक या केंद्राला भेट देतात. सुटीच्या दिवशी केंद्राला भेट देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मेट्रोचे कोच, त्यातील सुविधा यांचा अनुभव तयार केलेल्या मेट्रो कोचच्या प्रतिकृतीतून नागरिक प्रत्यक्षात घेतात.

तसेच काही सूचना देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे. मेट्रोच्या कोचमधील आसन व्यवस्था वाढवावी, मेट्रोचा मार्ग दाखविणारे फलक दरवाजासमोर असावेत, अशा सूचनाही नागरिकांकडून मेट्रोला देण्यात आले आहे. माहिती केंद्रातील नकाशे, माहितीपुस्तके  आणि टीव्हीच्या पडद्यावर दाखवल्या जात असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या माहितीमुळे नागरिकांना हा प्रकल्प समजून घेण्यासही मदत होत आहे.

प्रशिक्षितांकडून माहिती देण्याचे काम

मेट्रोचे हे माहिती केंद्र सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत नागरिकांसाठी खुले आहे. तसेच नागरिकांना माहिती देण्यासाठी चार प्रशिक्षित सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.