शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लोह आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे सोलापूर आणि इंदापूरमधील काही विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटय़ांचा त्रास झाल्यानंतर या गोळ्या पुरवलेल्या कंपनीचे नाव शासनाच्या परिपत्रकात नसल्याचे उघड झाले आहे.
शासनाने या गोळ्यांच्या पुरवठय़ासंबंधी काढलेल्या परिपत्रकात ‘कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स’, ‘राजस्थान ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स’ आणि ‘एचएलएल लाईफकेअर’ या तीन कंपन्यांकडून या गोळ्या खरेदी करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिल्याचे म्हटले आहे- ‘..सदर आयएफए गोळ्या केंद्र शासनाचे कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स, राजस्थान ड्रग अँड फार्मास्युटिकल्स आणि मे. एचएलएल लाईफकेअर लि. या उपक्रमांपैकी जे प्रति गोळी रु. ०.२९४ (व्हॅटसह) या दराने विहित कालावधीत पुरवठा करण्यास तयार असतील त्या उपक्रमांकडून पुरवठा करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.’
या तीनही कंपन्या परराज्यातील आहेत. मात्र सोलापूर आणि इंदापूर या दोन्ही प्रकरणात वापरण्यात आलेल्या गोळ्या पालघर (ठाणे) येथील ‘हिंदुस्थान लॅबोरॅटोरीज’ या कंपनीने बनवलेल्या असल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही प्रकरणांत राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आलेल्या अहवालांमध्ये गोळ्यांचे उत्पादक म्हणून हिंदुस्थान लॅबोरॅटरीजचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गोळ्यांची खरेदी राज्य आरोग्य विभागाच्या खरेदी कक्षातर्फे केली जाते आणि जिल्हा परिषदांतर्फे गोळ्यांचे वितरण केले जाते.
इंदापूरमधील शिवाजी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना १७ जुलै रोजी या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर उलटय़ा आणि जुलाबांचा त्रास झाला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या ठिकाणी केलेल्या पाहणीतून काढलेल्या निष्कर्षांत मात्र ‘लोकसत्ता’ला पाहायला मिळाले. या निष्कर्षांवरून लोह आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांचा डोस ठरवताना विद्यार्थ्यांचे वय, वजन आणि गोळ्या घ्यायची वेळ या गोष्टींचा पुरेसा विचारच न झाल्याचे उघडकीस आले आहे. इंदापूरच्या घटनेत सहावी ते आठवी इयत्तेतील ज्या विद्यार्थ्यांचे वजन कमी होते त्यांना गोळीचा डोस बाधला होता. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी किंवा जेवणानंतर खूप वेळ गेल्यावर गोळ्या घेतल्या होत्या, त्यांनाही गोळ्यांचे दुष्परिणाम जाणवले होते.
लोहयुक्त गोळ्या १०० मिलिग्रॅम तर फॉलिक अॅसिडच्या गोळ्या ५०० मायक्रोग्रॅमच्या डोसमध्ये देण्यात येतात. राज्यपातळीवर झालेल्या नवीन निर्णयानुसार या गोळ्या तीस किलोपेक्षा कमी वजन असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत असे ठरवण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख म्हणाले, ‘‘पूर्वीच्या मार्गदर्शकांनुसार या गोळ्या जेवणानंतर एक तासाने द्याव्यात अशी तरतूद होती. मात्र काही ठिकाणी ही गोष्ट पाळली जात नसल्यामुळे विद्यार्थी जेवण झाल्यावर दोन किंवा चार तासांनी गोळ्या घेत होते. आता झालेल्या निर्णयात या गोळ्या जेवणानंतर लगेच देण्याचे ठरवण्यात आले आहे.’’