अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळे देशातील गरिबांना जेवण मिळेल का, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना गुरुवारी पुण्यामध्ये विचारला.
पुण्यातील माईर्स एमआयटीने आयोजित केलेल्या सहाव्या भारतीय छात्र संसदेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मोहन भागवत आले होते. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरामध्ये एका विद्यार्थ्याने हा प्रश्न विचारला. या विद्यार्थ्याला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, आतापर्यंत राम मंदिर झाले नाही म्हणून गरिबांना जेवण मिळाले का? हा प्रश्न केवळ मंदिर बांधण्याचा नाही. आपल्या संस्कृतीचे काही आदर्श पुरुष आहेत. त्यांचे स्मारक उभे राहिले तर त्यातून प्रेरणाच मिळते. समाजासमोर अशा आदर्शांची उदाहरणे असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न आणि त्याला मोहन भागवत यांनी दिलेले उत्तर या दोन्हीला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.