जानेवारीपासून शहरात चार जणांना कुत्रे चावल्यामुळे रेबिज झाला असून यातील तिघांचा रेबिजमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत पालिकेकडे चारशेहून अधिक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. या दोन महिन्यांत १५०० हून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरणही करण्यात आले आहे. तरीही भटक्या कुत्र्यांचा त्रास काही कमी व्हायला तयार नाही.
ढोले पाटील रस्ता, संगमवाडी आणि येरवडा भागातील नागरिक कुत्र्यांच्या त्रासाला सर्वाधिक कंटाळले आहेत. या विभागातून (झोन-२) जानेवारीत ७६ तर फेब्रुवारीत ५९ नागरिकांनी पालिकेकडे कुत्र्यांबद्दल तक्रारी नोंदवल्या आहेत. त्याखालोखाल कसबा पेठ, विश्रामबाग वाडा, टिळक रस्ता, भवानी पेठ आणि सहकारनगरच्या नागरिक भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास सोसत आहेत. या नागरिकांनी गेल्या दोन महिन्यांत १३० तक्रारी नोंदवल्या आहेत. बिबवेवाडी, धनकवडी, कोंढवा, वानवडी आणि हडपसर हे भागही कुत्र्यांच्या उपद्रवात अग्रेसर आहेत. या भागातून जानेवारीत ६९ तर फेब्रुवारीत २६ तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. औंध, कोथरूड, वारजे, कर्वेनगर आणि शिवाजीनगर या भागात दोन महिन्यांत सुमारे ४३ तक्रारी आल्या असून कुत्र्यांचा उपद्रव तुलनेने कमी आहे.   
जानेवारील भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांमुळे ३ जणांना तर फेब्रुवारीत एकाला रेबिजची लागण झाली होती. यातील तिघांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते. उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘जानेवारीत पालिकेतर्फे ८२१ कुत्र्यांचे तर फेब्रुवारीत ६९० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. याच वेळी या कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लसही देण्यात आली आहे. कुत्रा चावल्यास पालिकेची १६ प्रसूतिगृहे आणि ३३ दवाखान्यांत (ओपीडी) मोफत उपचार उपलब्ध आहेत.’’