सरासरीच्या तुलनेत ६० मि.मी. पाऊस कमी;पाण्यासाठी आता मोसमी पावसावरच भिस्त

पुणे : मोसमी पाऊस लांबला तरी पूर्वमोसमी पाऊस चांगला बरसेल अशी आशा असताना प्रत्यक्षात पुणे शहर आणि परिसर पूर्वमोसमी पावसात उणेच ठरला आहे. पाणीपुरवठा होत असलेल्या धरण क्षेत्रातही पूर्वमोसमी पावसाने हात आखडता घेतला आहे. शहरात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ६० मि. मी. पाऊस कमी पडला असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आता मोसमी पावसाच्या स्थितीवर पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे.

यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र होता. पुणे शहरामध्ये बहुतांश वेळेला कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर नोंदविला गेला. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांतील तापमानाचा विक्रम नोंदवित कमाल तापमान यंदा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तीव्र उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठय़ा प्रमाणावर झाले. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासात यंदा विविध अडथळे आले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांच्या प्रवासात सर्वाधिक अडथळा आणल्याने त्यांचा प्रवास तब्बल दोन आठवडय़ांनी विलंबाने झाला आहे. मोसमी पावसापूर्वी होणारा पाऊसही दिलासादायक ठरू शकत असल्याने पूर्वमोसमीच्या बरसण्यावर लक्ष लागले होते. मात्र, या पावसाने निराशा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोसळलेल्या पूर्वमोसमी पावसाची स्थिती पाहिल्यास ती सरासरीच्या तुलनेत निराशाजनक असल्याचे दिसते. शहरात ९ जून वगळता २३ जूनपर्यंत एकदाही दमदार पाऊस झाला नाही. धरण क्षेत्रातही याच कालावधीत काहीसा पाऊस झाला. त्यानंतर पूर्वमोसमीने दडी मारली.

९ जूनला ४० मि. मी. पावसाची नोंद झाली. इतर काही दिवशी १ ते २ मि. मी. पाऊस होऊ शकला. काही ठिकाणी एक-दोन हलक्या सरी आल्या, पण त्यांची नोंद झाली नाही. अशा स्थितीत शहरात मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी २३ जूनपर्यंत केवळ ४२.४ मि. मी. पाऊस होऊ शकला. सरासरीनुसार या कालावधीत शहरात शंभरहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र, पूर्वमोसमी पावसाची सद्य:स्थिती पाहता सुमारे ६० मि. मी. पाऊस कमी पडला.

धरणांची स्थिती काय?

पुण्याला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतही पूर्वमोसमी पाऊस फारसा बरसला नाही. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने कमी होतो आहे. धरणसाखळीतील टेमघर धरण सध्या दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे. धरणसाखळीत इतर तीन धरणांत एकूण २.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा आहे. खडकवासलात ०.२४ टीएमसी, वरसगावमध्ये ०.७८, तर पानशेत धरणात १.४६ टीएमसी पाणी आहे. १५ जुलैपर्यंत या पाण्याचे नियोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एकूण पाणीसाठय़ापैकी काही पाणी पालखी आणि दुष्काळासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर झाल्याने आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोसमी पावसावरच पुणेकरांची भिस्त राहणार आहे.