हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज देखील पुणे शहरातील वातावरणात बदल झाला असून आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यातच विजांचा कडकडाट होऊन जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.

पुणे वेधशाळेने कालच राज्यात पाच-सहा दिवस पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच कोकण आणि मुंबईसह उपनगरांमध्ये २६-२८ तारखेपासून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, पुण्यात आज पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, काल मध्यरात्रीनंतर काही तास पुण्यात चांगलाच पाऊस बरसला. त्यानंतर आज सकाळी वातावरण स्वच्छ होते. सूर्यप्रकाश असल्याने उकाडाही वाढला होता. मात्र, दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.