दोन आठवडय़ांहून अधिक काळ रखडलेल्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता वेगाने सुरू आहे. महाराष्ट्राच्या निम्म्याहून अधिक भागातून एकाच दिवसात मोसमी पाऊस माघारी परतला. २८ ऑक्टोबपर्यंत तो देशातून माघारी परतणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

पाच महिन्यांहून अधिक काळापर्यंत यंदा देशात मोसमी पाऊस आहे. २८ सप्टेंबरला देशातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून आंध्र आणि तेलंगणसह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला. या स्थितीमुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या काही भागांपर्यंत येऊन १५ दिवसांहून अधिक काळ रखडला होता. गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कमी दाब क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

राज्यातून नियोजित आणि अंदाजित तारखेनुसार १० ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी परतणे अपेक्षित होते. मात्र, यंदा त्याला पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळाचा विलंब झाला आहे. या विलंबानंतर एकाच दिवसात तो निम्म्याहून अधिक राज्यातून माघारी फिरला आहे. संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ातून बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील निम्म्या भागातून मोसमी पाऊस २६ ऑक्टोबरला माघारी गेला. २७ तारखेला तो महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागातून मागे फिरणार आहे.

काही दिवस तापमानवाढ

जूनच्या सुरुवातीनंतर जवळपास पाच महिन्यांनी राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. यंदा पाऊस लांबल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव मिळाला नाही. मात्र, पुढील काही दिवस हवामानाच्या कोरडय़ा स्थितीने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.