प्रत्येकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे. मात्र, जिथे जाल तेथील संस्कृती आत्मसात केली पाहिजे. शीख बांधव इथे महाराष्ट्रीय होऊन राहिले. त्यांनी इथे येऊन स्वतःचे मतदारसंघ तयार केले नाहीत, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी शीख बांधवांचे कौतुक केले.
सरहद संस्थेतर्फे दिला जाणार ‘संत नामदेव’ पुरस्कार पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना बुधवारी देण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत नामदेवांनी पंजाबमध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख करताना एक शिंपीच धागा जोडण्याचे काम करू शकतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पावसाळ्याच्या तोंडावर ‘बादल’ महाराष्ट्रात आले आहेत, अशी कोटी करून या निमित्ताने तरी राज्यातील दुष्काळ दूर होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझा कोणत्याही राज्याला विरोध नाही. तुम्ही आम्हाला मान द्या, आम्ही तुम्हाला मान देऊ, असेच माझे विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
घुमानमध्ये झालेल्या साहित्य संमेलनासाठी बादल यांनी आणि पंजाब सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. घुमानचे संमेलन ऐतिहासिक होते. त्यामुळे संमेलनाच्या इतिहासात नवे पान जोडले गेल्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, शीख आणि मराठी या दोन समाजांनी स्वतःच्या हितापलीकडे जाऊन देशाच्या संरक्षणासाठी लढा दिला. संपूर्ण भारताला मुक्त करण्यासाठी, अत्याचारी शक्तींपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी या दोन्ही समाजांनी काम केले. घुमानमधील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे दोन्ही विचार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हा वारसा पुढेही चालविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.