राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून हे प्रश्न सोडवण्याबाबत सरकारबरोबर अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, यावर अद्याप कोणत्याही प्रकारचा तोडगा शोधण्यात आलेला नाही. पुण्यात दिपाली कोल्हटकर यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याला सर्वस्वी सामाजीक न्याय विभाग जबाबदार असल्याने या विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी याबात खुलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

गोऱ्हे म्हणाल्या, दिपाली कोल्हाटकर यांच्या हत्येची घटना लक्षात घेता. ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. जुलै २०१७ मध्ये अडचणीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कक्ष तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त कार्यालयात हा कक्ष चालू करण्यात आला. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता प्रत्येक तालुक्यासाठी २० नागरिकांचा वृद्धाश्रम चालू करण्याची गरज असून यासाठी केवळ १५ कोटींचा निधी लागणार आहे. तो निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

गोऱ्हे पुढे म्हणाल्या, सामाजिक न्याय विभागाकडे अनेक वेळा धोरणांबाबत चर्चा आणि पत्रव्यवहार केला. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्यापपर्यँत घेतला गेला नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवावर भाजपने मते मागितली त्याच सरकारने जेष्ठांना वाऱ्यावर सोडले आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.