पुण्यातील जलतरणपटूचे यश

बंगालच्या उपसागरातील सेंट मार्टिन्स आयलँड ते टेकनॅफ जेट्टी आणि परत सेंट मार्टिन्स आयलँड हे ३२.२ किलोमीटरचे सागरी अंतर दुहेरी पद्धतीने पोहून पार करण्याचा जागतिक विक्रम पुण्याच्या संपन्न रमेश शेलार या १७ वर्षीय जलतरणपटूने केला. अशा प्रकारे पोहणारा संपन्न हा जगातील एकमेव जलतरणपटू ठरला आहे. ३० मार्च रोजी ९ तास १० मिनिटामध्ये हे अंतर त्याने यशस्वीरीत्या पार केले.

संपन्न शेलार याचे मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्याचे प्रशिक्षक हर्षद इनामदार, वडील रमेश शेलार आणि आई शारदा शेलार या वेळी उपस्थित होत्या. बांगलादेशच्या मुसा इब्राहिम यांच्या एव्हरेस्ट अकॅडमीने या मोहिमेचे आयोजन केले होते.

खासनीस म्हणाले, संपन्न याने ३० मार्च रोजी सेंट मार्टिन्स आयलँडच्या किनाऱ्यावरून सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी पोहण्यास सुरुवात केली. पहिल्या तासामध्ये त्याने ५ किलोमीटर अंतर पार केले. परंतु पुढच्या तासामध्ये वारा अनुकूल नसल्याने त्याचा वेग मंदावला. टेकनॅफ बंदरापर्यंतचे १६.१ किलोमीटर अंतर त्याने पावणेचार तासांत पोहणे अपेक्षित होते. परंतु वाऱ्याचा वेग ताशी २५ किलोमीटर असा वाढल्याने हा पहिला टप्पा पार करण्याकरिता पाच तास लागले. १० वाजून ४० मिनिटांनी संपन्नने निम्मे अंतर पार केले. दहा मिनिटांची विश्रांती घेऊन त्याने परत पोहायला सुरुवात केली.  परतीच्या प्रवासात वाऱ्याचा फायदा घेत संपन्नने १६.१ किलोमीटर हे अंतर चार तासांत पार केले. परतीच्या वेळी वाऱ्याचा जोर वाढला होता, मात्र पाण्याखालील वातावरण अनुकूल होते. २ वाजून ५० मिनिटांनी त्याने मोहीम पूर्ण करीत जमिनीवर पाय टेकवले. सेंट मार्टन्सि आयलँड पोहताना संपन्नने दर ४५ मिनिटाला                  नारळपाणी, चॉकलेट, केळी असा आहार घेतला. दरम्यान, पोहताना त्याला खाऱ्या पाण्याचा आणि उन्हाचाही त्रास झाला.इनामदार म्हणाले,  एशियन कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्समध्ये संपन्न इयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे. तो शार्क अ‍ॅक्वेटिक क्लबमध्ये मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस आणि माझ्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. सकाळी दोन तास आणि सायंकाळी  तीन तास, तर शनिवार आणि रविवारी सलग आठ तास तो सराव करत असे. संपन्न याने यापूर्वी  वैयक्तिक पोहण्याचे चार विक्रम केले आहेत. परदेशातील हा त्याचा पहिला प्रयत्न होता. नुकत्याच झालेल्या ४० किलोमीटर वीर सावरकर ऑल इंडिया स्वीमिंगमध्ये त्याने दुसरा क्रमांक पटकाविला होता. संपन्न आता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या ८१ किलोमीटर रिव्हर भागीरथी रेस या स्पर्धेसाठी सराव करीत आहे.