आटापिटा करूनही पुणे १४व्या स्थानावर

स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल ठरण्यासाठी मोठा आटापिटा करूनही शहराला अपेक्षित मानांकन मिळविता आले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. कागदोपत्री केलेल्या उपाययोजना आणि सादरीकरणामुळे शहराला पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले आहे. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर दहाव्या स्थानी असलेले शहर यंदा १४ व्या स्थानावर फेकले गेले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहर उणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकराच्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पुणे शहराची स्वच्छतेविषयक पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महापलिकेला १० वे स्थान मिळाले होते. तर यंदाच्या म्हणजे २०१९ च्या सर्वेक्षणात हे मानांकन चौदाव्या स्थानी राहिले आहे. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुण्याचा देशपातळीवर ३७ वा क्रमांक राहिला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेने सहभाग नोंदविला होता. गुणांची विभागणी, नागरिकांची मते, लोकसहभागाबरोबरच निकषांची ऑनलाईन तपासणी या सर्वेक्षणात करण्यात येणार होती. स्पर्धात्मक, गुणात्मक आणि प्रभावी कामकाज यावर गुण मिळणार असल्यामुळे शहराला अव्वल करण्यासाठी खटाटोप सुरू झाला होता. आठ लाख नागरिकांकडून स्वच्छतेसंदर्भातील अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट ठेवून तीन लाख नागरिकांकडून ते सक्तीने डाऊनलोड करून घेण्यात आले होते. सर्वेक्षणाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी सातशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटाही जुंपण्यात आला होता. प्रभागनिहाय कामकाजाबाबतची यादी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. नागरिकांची मते जाणून घेणे, सूचना संकलित करणे, स्वच्छ सर्वेक्षणाच्या अ‍ॅपद्वारे आणि मोबाइलद्वारे माहिती संकलित करणे अशी कामे याअंतर्गत करण्याचे आदेश आयुक्त सौरव राव यांनी दिले होते.

स्वच्छ पुरस्कार,सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई असे उपक्रमही याअंतर्गत महापालिकेने हाती घेतले होते. लक्ष्य हे मोबाईल अ‍ॅप विकसित करून प्रभागातील पाहणींचे निकष नोंदविण्याचे निश्चित करण्यात आले होते. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर, घाण आणि लघुशंका करणाऱ्यांवर जागेवरच दंड आकारण्याच्या कारवाईचा धडाकाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आला होता. मात्र आटापिटा करूनही शहराला अपेक्षित मानांकन प्राप्त न झाल्यामुळे स्वच्छतेबाबत शहर उणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणातील निकषांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने केलेले चकाचक सादरीकरण आणि उपाययोजनाही फारशा उपयुक्त ठरल्या नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

होय’बा प्रश्नावली

एक पाऊल स्वच्छतेकडे असा संदेश देऊन सुरू झालेल्या सर्वेक्षणात नागरिकांची मते जाणून घेताना हेतूत: दिशाभूल करण्यात आल्याचेही समोर आले होते. महापलिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबतचा अभिप्राय (फिडबॅक) जाणून घेताना त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी सर्व सकारात्मक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले होते. सर्वेक्षणाला अनुकूल ठरण्यासाठी ‘होय’बा प्रश्नावली करण्यात आली होती.

अ‍ॅप डाऊनलोडची सक्ती

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्यामुळे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती प्रशासनाकडून करण्यात येत होती. किमान आठ लाख नागरिकांकडून मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट त्यासाठी निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी किमान तीन लाख नागरिकांकडून ते डाऊनलोड करून घेण्यात आले होते. मात्र अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निराकरण केवळ कागदोपत्री होत असल्यामुळे समाजमाध्यमातून आणि महापलिकेच्या संकेतस्थळावरही त्याबाबत नागरिकांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत

शहरातील स्वच्छतेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. प्रमुख चौकात वा गल्लीबोळात गेल्यास अस्ताव्यस्त पडलेला कचरा, फुटक्या-तुटक्या कचराकुंडय़ा, राडारोडय़ांचे ढीग, अस्वच्छ नदीपात्र, सार्वजनिक इमारती आणि कार्यालयांमधील अस्वच्छता, भिंतींवरील पिचकाऱ्या, मोकाट श्वानांच्या टोळ्या हे स्वच्छ आणि सुंदर पुण्यातील तसेच स्मार्ट सिटीतील चित्र शहर स्वच्छतेची वस्तुस्थिती स्पष्ट करणारे आहे.