News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या नावाने ५३ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या १८ मिनिटांच्या दुर्मीळ लघुपटाची भर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात पडली.

या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे १९६८ च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती. ‘व्हटकर प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली निर्मित करण्यात आलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. ज्येष्ठ संगीतकार दत्ता  डावजेकर यांनी या लघुपटाला संगीत दिले होते. प्रसिद्ध अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी लघुपटाचे निवेदन केले होते.

डॉ. आंबेडकर यांची १३० वी जयंती बुधवारी सर्वत्र उत्साहाने साजरी केली जात असतानाच डॉ. आंबेडकर यांच्यावरील हा दुर्मीळ लघुपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त होणे हा एक अपूर्व योगायोग आहे, अशी भावना संग्रहालयाचे संचालक  प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली. या लघुपटात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तसेच त्यांच्या अखेरच्या काळातील काही घटनांचे चित्रीकरण पाहायला मिळते.

डॉ. आंबेडकर यांनी नागपूर येथे स्वीकारलेला बुद्ध धर्म,  त्यांनी केलेला नेपाळ दौरा, मुंबईच्या दादर चौपाटी येथे आंबेडकर यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे ठळक चित्रीकरण या लघुपटात पाहायला मिळते. या लघुपटाचे छायाचित्रण मधुकर खामकर यांनी केले असून जी. जी. पाटील यांनी संकलन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

वास्तविक हा लघुपट मुळात ३५ एमएम च्या स्वरूपात होता. परंतु, त्याची १६ एमएम स्वरूपातील प्रिंट आम्हाला मिळाली आहे. कदाचित ग्रामीण भागात वितरण करण्याच्या हेतूने १६ एमएम च्या प्रिंट्स काढण्यात आल्या असाव्यात. या प्रिंटची सध्याची अवस्था ही मध्यम स्वरूपातील असून त्याचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येईल, अशी माहिती मगदूम यांनी दिली.

नामदेव व्हटकर हे एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री सुलोचना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आहेर’ या चित्रपटाचे आणि १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मुलगा’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन व्हटकर यांनी केले होते. ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांच्या ‘घरधनी’ या चित्रपटाचे कथालेखन त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमवेत केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:13 am

Web Title: rare short film on dr babasaheb ambedkar abn 97
Next Stories
1 उच्च शिक्षण अपूर्ण राहिलेल्यांनाही आता पदवी मिळवण्याची संधी
2 ससून सर्वोपचार रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांसाठी अत्यल्प खाटा राखीव
3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाची रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती
Just Now!
X