पुणेकर रौनक भिंगेची कामगिरी; उद्योगजगताला उपकारक उपकरणाची निर्मिती

पीएच.डी. संशोधनाच्या गुणवत्तेविषयी शंका उपस्थित केल्या जात असताना पुणेकर रौनक भिंगे या तरुणाने पीएच.डी.च्या प्रबंधातून इन्फाइनाइट अपटाइम हे स्टार्टअप साकारले आहे. उद्योगजगताला उपकारक ठरणाऱ्या ‘इंडस्ट्रियल डेटा एनॅब्लर’ या छोटय़ाशा उपकरणाची निर्मिती रौनकने केली असून, त्यासाठी त्याला जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून ३० कोटी रुपयांचे सीरिज ए फंडिंग प्राप्त झाले आहे.

रोहन भिंगेने या विषयी माहिती दिली. पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून बारावी झाल्यानंतर  रौनकने आयआयटी मद्रासमधून बीटेक आणि एमटेकचे शिक्षण घेतले. त्यानंतर कॅलिफोर्नियातील बर्कले येथून ‘डेटा ड्रिव्हन मॅन्युफॅक्चरिंग युझिंग एक्स्टर्नल सेन्सर्स फॉर एनर्जी अँड टूल’ या विषयात त्याने पीएच.डी. पूर्ण केली. त्यात उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या कारखान्यांतील महत्त्वाची यंत्रसामग्री ऐनवेळी बंद पडल्यास मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी यंत्रांच्या बिघाडपूर्व देखभालीसाठी इंडस्ट्रियल डेटा एनॅब्लर या उपकरणाचे संशोधन केले. कारखान्यांतील यंत्रांवर लावलेल्या सेन्सरद्वारे मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून यंत्रात कधी, कोणता बिघाड होऊ शकतो याची आधीच कल्पना येऊ शकते. त्यामुळे कारखान्यांना बिघाड होण्यापूर्वीच यंत्राची देखभाल करणे शक्य होते. रौनकने पीएच.डी. पूर्ण करून या तंत्राचे पेटंटही घेतले आहे. याच पीएच.डी. प्रबंधावर आधारित व्यवसाय उभा करण्यासाठी त्याने २०१६ मध्ये इन्फाइनाइट अपटाइम हे स्टार्टअप सुरू केले. रौनकने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामध्ये त्याला जवळपास ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक जागतिक स्तरावरून झाली आहे. आजच्या घडीला तो अनेक मोठय़ा कंपन्यांसाठी हे तंत्रज्ञान पुरवत आहे.

‘औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेले देश आणि भारत यांच्यातील कार्यक्षमतेमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यात वेळेचा अपव्यय हे महत्त्वाचे कारण आहे. यंत्रांची नादुरुस्ती होण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्याच्या दुरुस्तीमध्ये बराच वेळ जातो. इंडस्ट्रियल डेटा एनॅब्लर या उपकरणामुळे हा वेळ वाचू शकतो, कार्यक्षमता वाढू शकते हे सिद्ध झाले आहे,’ असे रौनकने सांगितले.

आज मोठय़ा कारखान्यांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान येत्या काळात घराघरांमध्ये नेण्याचा प्रयत्न आहे. घरगुती उपकरणांसाठीही वापर करण्याच्या शक्यता त्यात आहेत. त्यामुळे त्याला किफायतशीर करतानाच त्याचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.    – रौनक भिंगे, व्यवस्थापकीय संचालक, इन्फाइनाइट अपटाइम