11 December 2017

News Flash

वाचनवेडय़ाचे आगळे संकेतस्थळ

नववीच्या वर्गात शिकणारा अथर्व किरण पाटील हा वाचनवेडा विद्यार्थी, मुंबईच्या सेंट ग्रेगोरिअस हायस्कूलमध्ये तो

मुलाखत : रसिका मुळ्ये, पुणे | Updated: January 23, 2016 3:22 AM

किरण पाटील

नववीच्या वर्गात शिकणारा अथर्व किरण पाटील हा वाचनवेडा विद्यार्थी, मुंबईच्या सेंट ग्रेगोरिअस हायस्कूलमध्ये तो शिकतो; पण त्याने सुरू केलेल्या एका आगळ्या उपक्रमात पुण्यातील दहा शाळाही सहभागी झाल्या आहेत. आपण जे वाचतो ते इतरांनाही कळावे, वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती आपल्या मित्रमंडळींनाही व्हावी म्हणून किरणने पुस्तक परीक्षणांचे एक संकेतस्थळ सुरू केले आहे. www.ihavereadthebook.com या संकेतस्थळावर मुलांसाठी इंग्रजीत असणाऱ्या पुस्तकांचा सारांश वाचता येतो. या पुस्तकांवर ९ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपली परीक्षणे लिहायची, अशी या उपक्रमामागची संकल्पना आहे. अधिक पुस्तके वाचून अधिक परीक्षणे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांला या संकेतस्थळाच्या संपादक मंडळात सहभागी करून घेतले जाते. एप्रिल २०१५ मध्ये सुरू झालेल्या या संकेतस्थळावर १० हजारांहून अधिक पुस्तकांचे सारांश उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे एक वर्षांच्या आत या संकेतस्थळावर देशभरांतील विद्यार्थ्यांनी साडेतीनशेहून अधिक पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत. अथर्वच्या संकल्पनेबद्दल त्याच्याच शब्दांत..

पुस्तक परीक्षणांचे संकेतस्थळ सुरू करण्याची संकल्पना कशी सुचली?
मला पुस्तके वाचायला आवडतात. आई-बाबांनी दोन वर्षांपूर्वी सुट्टीत मला खूप पुस्तके आणून दिली; पण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्यात काय आहे, ते आपल्याला आवडेल का याची कल्पना यायला हवी असे वाटले. पुस्तकांची परीक्षणे असतात किंवा प्रकाशनेही त्याचा सारांश सांगतात; पण तरीही ते पुस्तक कसे आहे ते नेमके कळत नाही. मी हे बाबांना विचारल्यावर त्यांनी इंटरनेटवर पुस्तकांची परीक्षणे शोधायला सांगितली. पण त्या वेळी मुलांनी लिहिलेली परीक्षणे मला सापडली नाहीत. याबद्दल बाबांशी बोलत असताना या संकेतस्थळाची संकल्पना पुढे आली आणि त्यांच्या मदतीने हे संकेतस्थळ सुरू केले.

मुलांपर्यंत या संकेतस्थळाची माहिती कशी पोहोचली?
मुलांना असे काही आहे हे कळावे म्हणून संकेतस्थळ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यांत असतानाच देशभरातील शाळांची माहिती इंटरनेटवरून गोळा केली. त्यानुसार शाळांना मेल आणि पत्रे पाठवून ही संकल्पना सांगितली. हे संकेतस्थळ सुरू तयार करण्यासाठी पुण्यातील ‘मास्टर इक्वेशन्स’ या संस्थेची मदत आम्ही घेतली. डिसेंबर २०१४ मध्ये या संकेतस्थळाचे काम सुरू झाले. एप्रिल २०१५ मध्ये हे संकेतस्थळ सुरू झाले. ज्यांना कल्पना आवडली अशा काही शाळांनी उत्तर दिले. त्यात पुण्यातील अनेक शाळा आहेत. भारताप्रमाणेच सिंगापूरमधील काही शाळांशीही संपर्क केला होता त्यालाही उत्तर आले. यासाठी मला माझ्या मित्रांनी मदत केली. आम्ही सगळे मिळून ही पत्रे पाठवायचो. फेसबुक आणि ट्विटरवर या संकेतस्थळाची माहिती, पुस्तकांतील कोट्स असे शेअर करायला सुरुवात केली.  ३४० शाळांमधील एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. एक लाखापेक्षा अधिक वेळा हे संकेतस्थळ  विविध ठिकाणांहून पाहण्यात आले आहे.

आय हॅव रेड द बुक.. हे नाव कसे सुचले?
मी पुस्तक वाचलेय आणि ते मला कसे वाटले हे सांगणे हाच हेतू होता. म्हणून हे नाव सुचले. ते सोपेही वाटले आणि आकर्षकही वाटले. या संकेतस्थळार पुस्तके दान करण्यासाठी नोंदणी करण्याचा एक रकाना आहे. त्यालाही प्रतिसाद मिळू लागला आहे. जेथे इंटरनेट नाही अशा ठिकाणी आलेली पुस्तके दान करण्याची कल्पना आहे. या संकेतस्थळावर पुस्तक परीक्षणाच्या आणि कथा लेखनाच्या स्पर्धाही  घेतल्या.

शाळा, अभ्यास सांभाळून याला वेळ कसा देतोस?
शाळा, अभ्यास हे करावेच लागते. पण मी दिवसातले कमीतकमी दोन तास संकेतस्थळासाठी देतो. सुरुवातीला नोंदणी करताना मुलांना अडचणी येत होत्या. तेव्हा खूप गोंधळ झाला होता. पण आता सगळे सुरळीत झाले आहे. वाङ्मयचौर्य शोधणाऱ्या मोफत प्रणाली इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने मी आलेली सगळी परीक्षणे तपासतो. ज्या परीक्षणांत ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक मजकूर चोरलेला आढळतो. त्या मुलाला मी याबाबत मेल करतो आणि पुन्हा लिहिण्याची विनंती करतो. त्याला १५ दिवसांत प्रतिसाद मिळाला नाही, तर ते परीक्षण संकेतस्थळावरून काढून टाकले जाते. दर आठवडय़ाच्या अखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी ४ ते ५ तास  देतो. तेवढे पुरतात.

मराठी पुस्तके येणार आहेत का?
मराठीतील मुलांसाठीचीच पुस्तके यामध्ये घ्यायची आहेत. त्याचप्रमाणे मराठीत टायपिंग करून परीक्षण लिहिण्यासाठीची तांत्रिक तयारीही अजून नाही. पण मराठी आणि हिंदी या भाषांतही हे संकेतस्थळ सुरू करायचे आहे. यासाठी व्यावसायिक पद्धतीने जाहिरातीही घेता येतील का याचा विचार करत आहोत.

First Published on January 23, 2016 3:22 am

Web Title: reading website rasika mulay kiran patil