राज्यातील १५ विद्यापीठांतील प्राध्यापकांची ६५९ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदभरतीसाठी विद्यापीठांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाने केले आहे.

राज्यात बारा अकृषी विद्यापीठांसह टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठांमध्ये ही पदे भरली जाणार आहेत. विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची एकूण २ हजार ५३४ मंजूर पदे आहेत. त्यापैकी १ हजार ३८८ पदे भरलेली आहेत. तर १ हजार १६६ पदे रिक्त आहेत. शासनाकडून रिक्त पदांच्या ४० टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असल्याने ६५९ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पदभरतीसाठीचे प्रस्ताव विद्यापीठांकडून मागवण्यात आले आहेत. या संदर्भात उच्च शिक्षण संचालनालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या दोन विद्यापीठांनी बिंदुनामावली तपासून प्रस्ताव पाठवले आहेत. प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी अन्य विद्यापीठांनीही तातडीने या संदर्भातील कार्यवाही करावी, असे उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले.