अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 जुलै रोजी 4 वर्षे पूर्ण होत असून त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही, ही दुर्देवी बाब आहे. हे सरकार गुन्हेगारांना शोधण्यात अपयशी ठरले असल्याची टीका अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी येथे केली. या प्रकरणी सरकारने धिक गांर्भीर्याने पाहणे गरजेचे असून त्यादृष्टीने 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली. पण त्यांना वेळ नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 20 जुलै रोजी 4 वर्षांचा कालवधी होत आहे. मात्र, एवढा कालवधी होऊन देखील जे मारेकरी समोर आले आहेत. त्यांना शिक्षा देण्यात हे सरकार अपयशी ठरले असून अद्याप ही इतर मारेकऱ्यांचा शोध घेतला जात नाही. तसेच दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत कारण यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाना साधला. या पार्श्वभूमीवर राज्यभर 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक भागातील मंत्री, खासदार आणि आमदार यांना निवेदन देऊन या प्रकरणी जाब विचारणार असून हे प्रकरण मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.