News Flash

मराठी पुस्तकांच्या खरेदीलाही ‘ऑनलाईन’चा आधार!

बदलत्या काळानुसार अनेक मराठी प्रकाशकांनीही विक्रीच्या पद्धतीत बदल केले असून, त्यात ‘ऑनलाईन’ची भर पडली आहे. विशेष म्हणजे वाचकांचाही त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे.

| May 22, 2014 03:13 am

बदलत्या काळानुसार अनेक मराठी प्रकाशकांनीही विक्रीच्या पद्धतीत बदल केले असून, त्यात ‘ऑनलाईन’ची भर पडली आहे. विशेष म्हणजे वाचकांचाही त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. एखादे पुस्तक हवेच आहे, पण, नोकरी-व्यवसायामुळे दुकानामध्ये जाऊन खरेदी करण्यासाठी वेळ नाही; अशा वाचकांनासाठी तर ‘ऑनलाईन खरेदी’ हाच आधार बनला आहे. पुण्यातील महत्त्वाच्या प्रकाशकांनी ऑनलाईन खरेदी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर वाचकाने ई-मेलद्वारे नोंदणी केल्यानंतर त्याला पोस्टाने किंवा कुरिअरच्या माध्यमातून पुस्तक घरपोच दिले जात आहे.
पारंपरिक पद्धतीने दुकानांमध्ये जाऊन पुस्तकांची खरेदी करण्याची पद्धत सध्या अस्तित्वात आहेच. त्याचबरोबर आता ऑनलाईन खरेदी हे माध्यमही उपलब्ध झाले आहे. राजहंस प्रकाशनने आपल्या संकेतस्थळावर ही सुविधा दिली आहे. भविष्यात पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे ऑनलाईन हे महत्त्वाचे माध्यम ठरेल, असे दिलीप माजगावकर यांनी सांगितले. वाचक तंत्रज्ञानाभिमुख होत असताना या बदलाची दखल प्रकाशकांनीही घेतली आहे. मात्र, पुस्तके हाताळून खरेदी करण्याची मानसिकता असल्याने दुकानांचे महत्त्व कमी होईल असे वाटत नाही. ‘क्रॉसवर्ड’च्या धर्तीवर मांडणी केली गेली तर दुकानांतून पुस्तकांची खरेदी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
रोहन प्रकाशनने आपल्या संकेतस्थळावर पुस्तकांची माहिती दिली आहे. ते पाहून वाचक नव्या पुस्तकांची दखल घेत नोंदणी करू शकतात. बुकगंगा, फ्लिपकार्ट, अॅमॅझॉन अशा सेवा देणाऱ्या संकेतस्थळांवरूनदेखील पुस्तकांची नोंदणी करता येते. एखाद्या लेखकाच्या अन्य पुस्तकांची सूची, विशिष्ट विषयांवरील वेगवेगळ्या पुस्तकांची सूचीदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. वाचक क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे किंवा नेटबॅकिंगच्या माध्यमातून पुस्तकाची किंमत देऊ शकतात. एखाद्या वाचकाची खरेदी तीनशे रुपयांहून अधिक असेल तर त्याला घरपोच पुस्तक पोहोचविले जाते, अशी माहिती रोहन चंपानेरकर यांनी दिली.
मेहता पब्लिशिंग हाऊसच्या दीड लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री दरमहा होते. संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या वाचकांना कॅश ऑन डिलिव्हरी  तत्त्वावर पुस्तके घरपोच दिली जातात. एक हजार रुपयांहून अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा पोस्टेज खर्च प्रकाशनातर्फे उचलला जातो, असे सुनील मेहता यांनी सांगितले.
ऑनलाईन खरेदी प्रकाशकांसाठी उपयोगाची असल्याचे मनोविकास प्रकाशनचे अरिवद पाटकर यांनी सांगितले. पुस्तकाची विक्री करणाऱ्या दुकानदाराला क्रेडिट द्यावे लागते. ऑनलाईन पद्धतीमध्ये पैसे ताबडतोब मिळतात. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या शहरातील वाचकांकडून ऑनलाईन खरेदीला चांगला प्रतिसाद असल्याचे पाटकर यांनी नमूद केले. बुकगंगा, फ्लिपकार्ट या माध्यमातून वाचकाने नोंदणी केल्यानंतर त्याला पुस्तक घरी पोहोचविले जाते. ग्रंथ व्यवहारामध्ये ही वाट चांगली रुळेल, असे पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यांनी सांगितले.
 
‘राजहंस’चा नवा प्रयोग
राजहंस प्रकाशनने ‘लोकसत्ता’मध्ये गेल्या वर्षी प्रकाशित झालेले ‘गल्लत, गफलत, गहजब’ हे सदर संकेतस्थळावरून वाचकांपर्यंत पोहोचविले आहे. त्या लेखनाला उदंड प्रतिसाद लाभला. आतापर्यंत २४०० जणांचे ई-मेल आले आहेत. एवढेच नव्हे तर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. या प्रयोगाला यश लाभले असून अशा पद्धतीने नवीन पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे दिलीप माजगावकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 3:13 am

Web Title: response to online purchase for books
Next Stories
1 अकार्यक्षमता झाकण्यासाठी पीएमपी दरवाढीचा प्रस्ताव
2 विद्यापीठ परिसरात अखेर पोलिसांची गस्त सुरू!
3 आयसीएसईच्या परीक्षेत पुण्यातील प्रिया नायर, अॅशले कॅस्टेलिनो देशात तिसऱ्या
Just Now!
X