बनावट ईमेल पाठवून फसवले

पुणे : सायबर चोरटय़ांकडून सामान्यांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. कोंढवा भागातील हवाई दलातील एका निवृत्त अधिकाऱ्याची चोरटय़ांनी त्यांच्या मित्राच्या नावाने बनावट ईमेल पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत ६५ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एक मोबाईलधारक तसेच बँक खातेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अधिकारी आणि त्यांची पत्नी परदेशात गेले होते. त्या वेळी त्यांना अज्ञाताने त्यांच्या निकटवर्तीय मित्राच्या नावाने बनावट ईमेल पाठविला होता. पुण्यात मी बांधकाम करत आहे. तातडीने एक लाख रुपयांची गरज असल्याचे मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदाराने विश्वास ठेवला.

त्यानंतर अज्ञाताने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी एक लाख रुपये बँक खात्यात जमा केले. दरम्यान, तक्रारदार अधिकारी आणि मित्र पुण्यातील एका हॉटेलमध्ये भेटले. तेव्हा अधिकाऱ्याने मित्राकडे विषय काढला. तेव्हा मित्राने मी कधीच पैशांची मागणी करणारा ईमेल पाठविला नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक महादेव कुंभार तपास करत आहेत.

आणखी एक प्रकार उघड

मार्केटयार्ड परिसरातील एका बँक खातेधारकाचा  बँक व्यवहाराचा सांकेतिक शब्द लांबवून चोरटय़ांनी त्यांच्या खात्यातून १ लाख ७९ हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तक्रारदाराचा सांकेतिक शब्द चोरण्यात आल्यानंतर चोरटय़ांनी खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करत आहेत.