आत्महत्या करणाऱ्या महिलेसह चौघांना वाचवले

कौटुंबिक वादातून बी. टी. कवडे रस्ता भागातील कालव्यात तीन मुलांसह उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने वाचविल्याची घटना शनिवारी घडली.

सेवानिवृत्त लष्करी अधिकारी सुरेश भोसले यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. भोसले हे सेवानिवृत्त मेजर आहेत. भोसले बी. टी. कवडे रस्त्यावरून सकाळी  लष्कराच्या कॅन्टीनमध्ये खरेदीसाठी निघाले होते. या भागातील कालव्यालगत एक महिला थांबली होती. तिच्या कडेवर सहा महिन्यांचा मुलगा होता तसेच एक सहा वर्ष आणि आठ वर्षांचा मुलगा होता. अचानक तिने मुलांसह कालव्यात उडी मारली. भोसले यांनी हा प्रकार पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कालव्यात उडी मारली. त्यांनी कालव्यातून रस्त्याने जात असलेल्या नागरिकांना मदतीसाठी हाक मारली. पण तेथून जाणाऱ्या काही जणांनी दुर्लक्ष केले. त्या वेळी तेथून जाणाऱ्या सतीश गुंजाळ आणि अमित रावळ यांनी हा प्रकार पाहिला.

पाण्यात पडलेल्या महिलेच्या कडेवर असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाला त्यांनी कालव्याच्या काठावर आणले. त्यानंतर दोन्ही मुलांना पाण्यातून गुंजाळ आणि रावळ यांच्या मदतीने भोसले यांनी बाहेर काढले. पाण्यात गटांगळय़ा खाणाऱ्या महिलेला त्यांनी आधार देऊन बाहेर काढले. नागरिकांच्या मदतीने तातडीने महिलेसह तीन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोसले यांनी दाखविलेल्या धाडसाचे पोलिसांनी कौतुक केले.

बघ्यांची गर्दी, पण मदतीसाठी नाही

बी. टी. कवडे रस्त्यालगत असलेल्या कालव्यात महिलेने मुलांसह उडी मारल्यानंतर सुरेश भोसले यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, पण काही नागरिकांनी दुर्लक्ष केले. त्यांना सतीश गुंजाळ आणि अमित रावळ यांनी साहाय्य केले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली, पण मदतीसाठी कोणी धावले नाही, अशी खंत भोसले यांनी व्यक्त केली.