पुणे : महसूल विभागाकडून बेकायदा वाळू उपसा प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईत वाळूचा ट्रक पळवून पसार झालेला एकजण दहा महिन्यानंतर पकडला गेला. हडपसर भागातील शेवाळवाडी फाटय़ावर ही घटना घडली होती.

किसन सोपान जाधव (वय ४५,रा. गिरीम, जाधववाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी शेवाळवाडी फाटा परिसरात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ट्रकवर महसूल विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. जाधव महसूल विभागाच्या ताब्यात असलेला ट्रक घेऊन पसार झाला. या प्रकरणी मंडल अधिकाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी पुणे-सोलापूर रस्त्यावर सापळा लावून जाधवला ताब्यात घेतले.