पर्वती मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या जयश्री बागूल यांनी मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करत निवडणूक लढवण्याचा निर्धार सोमवारी व्यक्त केला. पर्वतीमधून काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांना पक्षाने उमेदवारी दिली असून बागूल यांच्या उमेदवारीमुळे त्यांना आता पक्षातच आव्हान निर्माण झाले आहे. अनेक संघटनांनी या मेळाव्यात बागूल यांना पाठिंबा जाहीर केला.
पर्वतीमधून छाजेड यांच्याबरोबरच उपमहापौर आबा बागूल हेही इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा आग्रह धरला. मात्र, बागूल यांनी अर्ज भरला नाही. त्यांनी अर्ज भरला नसला, तरी त्यांची पत्नी जयश्री यांनी मात्र अर्ज दाखल केला असून त्यांच्या समर्थकांनी सोमवारी पर्वती मतदारसंघात निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.
सातारा रस्त्यावरील अजिंक्य मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात महिलांची मोठी उपस्थिती होती. अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मेळाव्यात बागूल यांना पाठिंबा जाहीर केला. नगरसेवक म्हणून काम करताना आबा बागूल यांनी अनेक चांगली कामे प्रभागात केली आहेत. त्यांना आमदार बनण्याची संधी दिली गेली असती, तर त्यांनी पर्वती मतदारसंघात चांगले काम करून दाखवले असते. अशा परिस्थितीत त्यांची उमेदवारी का नाकारण्यात आली, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. जयश्री बागूल यांना विजयी करण्याचा निर्धारही मेळाव्यात करण्यात आला. उपमहापौर आबा बागूल, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे, ओबीसी महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. पी. बी. कुंभार, झोपडपट्टी जन विकास परिषदेचे अध्यक्ष विश्वास दिघे, गुलाबराव ओव्हाळ, तसेच बाळासाहेब भामरे, रामदास धोत्रे आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
सर्व समाजघटकांनी जे प्रेम दाखवले आहे त्या लोकभावनेचा निश्चितपणे आदर करू, असे समारोप्रसंगी बागूल यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2014 रोजी प्रकाशित
पर्वतीत आबा बागूल यांची बंडखोरी कायम
पर्वती मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या जयश्री बागूल यांनी मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करत निवडणूक लढवण्याचा निर्धार सोमवारी व्यक्त केला.

First published on: 30-09-2014 at 03:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revolt of aba bagul continue in parvati constituency