‘फँड्री’ या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असून गेला आठवडाभर संगीतकार अजय-अतुल यांनी बनवलेले फँड्रीचे ‘थीम साँग’ यू-टय़ूबवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत या गाण्याला यूटय़ूबवर तब्बल १ लाख ७७ हजारपेक्षा अधिक हिट्स मिळाले होते.
येत्या शुक्रवारी म्हणजे १४ तारखेला फँड्री चित्रपटप्रेमींच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाची अधिकृत झलक असलेला व्हिडिओ तीन आठवडय़ांपूर्वीच यू-टय़ूबवर प्रदर्शित करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत या व्हिडिओला ६०,८३९ हिट्स मिळाल्या होत्या. मात्र या ट्रेलरपेक्षाही फँड्रीची झलक दाखवणाऱ्या अजय-अतुल यांच्या थीम साँगने नेटिझन्सची प्रचंड गर्दी खेचली. केवळ सातच दिवसांत या गाण्याला यू- टय़ूबवर १,७७,३९४ हिट्स मिळाल्या. फँड्रीच्या रिंगटोन्सना असणारा प्रतिसादही वाढता असून फेसबुकवरही या चित्रपटाने चांगलीच गर्दी खेचली आहे.
 ‘तुज्या पिरतीचा इंचू मला चावला’ असे शब्द असलेले हे गाणे संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे रांगडे शब्द, खडा आवाज आणि हलगीचा नाद या सगळ्याने तरुणाईला वेड लावले आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ते तुफान लोकप्रिय झाले आहे. महाविद्यालयांच्या कँटीन्समध्ये या गाण्याचे व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलवर गाजत आहेत.
नुकत्याच झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट, दिग्दर्शन, अभिनय या सर्वच आघाडय़ांवर पुरस्कार मिळवून फँड्रीने आपली लोकप्रियता सिद्ध केली होती. या उदंड प्रतिसादानंतर या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. विशेषत: या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावलेल्या सोमनाथ अवघडे या नवोदित नायकाचे काम पाहण्याची उत्सुकताही तरुणांकडून व्यक्त होत आहे.