चिंचवड परिसरातील एका मॉलमधून गेल्या काही दिवसांपासून सौंदर्यप्रसाधने, सुवासिक तेलाच्या बाटल्या, सुवासिक स्प्रे तसेच महागडय़ा वस्तूंची चोरी होत होती. मात्र, मॉलमधील कर्मचाऱ्यांनाही चोरी होत असल्याचे कळत नव्हते. मॉलमधील चोरीचा हा ‘उद्योग’ पिंपरी पोलिसांनी उघडकीस आणला आणि चोरटय़ांकडून व्हिक्सच्या बाटल्या, सौंदर्यप्रसाधने, सुवासिक तेलाच्या बाटल्या असा एक लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. शर्टखाली वस्तू लपवून हे चोरटे पसार व्हायचे.

मॉलमधील हे चोरटे पोलिसांना सापडले असून, विजय मल्हारी कांबळे (वय २६, रा. सिद्धार्थनगर, दापोडी), अजय सुरेश मंडले (वय २६, एकता चौक, रूपीनगर, चिंचवड), कृष्णा निवृत्ती गायकवाड (वय २६) आणि सागर पोपट लोखंडे (वय २३, दोघे रा. अजंठानगर, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. चिंचवड स्टेशन परिसरातील एका मॉलमधून विविध वस्तूंच्या चोऱ्या होत होत्या. विशेषत: सुवासिक स्प्रे, तेलाच्या बाटल्या, जेल, व्हिक्सच्या बाटल्या चोरीला जात होत्या. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येत नव्हता. आरोपी कांबळे, मंडले, गायकवाड, लोखंडे हे टापटिपीत कपडे घालून मॉलमध्ये जायचे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय यायचा नाही. मॉलमधील गर्दीचा फायदा घेऊन ते शर्टमध्ये वस्तू लपवून मॉलबाहेर लावलेल्या मोटारीतून पसार व्हायचे, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पिंपरी ते मोरवाडी रस्त्यावर पिंपरी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी कांबळे, मंडले, गायकवाड आणि लोखंडे मोटारीत बसले होते. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला थांबलेली मोटार पाहिली. पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास कामुनी यांना संशय आल्याने त्यांनी मोटारीत बसलेल्या चौघांची चौकशी सुरू केली. मोटारीत ठेवलेल्या पिशवीची पाहणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत सुवासिक स्प्रे (डिओ), तेलाच्या बाटल्या, साबण, शाम्पूच्या बाटल्यांसह अन्य वस्तू सापडल्या. सुरुवातीला त्यांनी मॉलमधून नुकतीच खरेदी करून आल्याचे पोलिसांना सांगितले. एवढा माल कशासाठी विकत घेतला, अशी विचारणा पोलिसांनी केली, तेव्हा चोरटे गडबडून गेले. पोलिसी खाक्या दाखवताच चोरटय़ांनी मॉलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली, असे डॉ. मुगळीकर म्हणाले. पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगळीकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कामुनी, बाळासाहेब अंतरकर, सहायक फौजदार अरुण बुधकर, विजय जाधव, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, सुर्वे, दादाराम जाधव, जावेद पठाण, महादेव जावळे, लक्ष्मण आढारी, दादा धस, संतोष भालेराव यांनी ही कारवाई केली.

मॉलमध्ये चोरी करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीने लंपास केलेल्या वस्तू या दैनंदिन वापरातील आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक मॉलमध्ये यापूर्वी चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. टापटीप कपडे घालून मॉलमध्ये शिरणारे चोरटे मोटारीतून यायचे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय यायचा नाही. चोरलेल्या वस्तूंची ते कोणाला विक्री करायचे या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, िपपरी