भोरडय़ांचे थवे मोठय़ा संख्येत दाखल

पुणे जिल्ह्य़ातील उजनी जलाशयात रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आगमन सुरु झाले असले तरी दरवर्षीच्या तुलनेत अद्याप पक्ष्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना रोहित ऐवजी कोकणातून स्थलांतरित झालेले भोरडय़ांचेच थवे पाहण्यावर समाधान मानावे लागत आहे.

इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयालगतच्या गावांमध्ये जानेवारी महिन्यात रोहित पक्ष्यांचे थवे येण्यास सुरुवात होते. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या या पक्ष्यांचे नयनरम्य थवे पाहण्यासाठी पर्यटक आणि छायाचित्रकार मोठय़ा संख्येने या परिसराला भेट देतात. यंदा जानेवारीचा चौथा आठवडा सुरु झाला असला तरी दरवर्षीच्या प्रमाणात रोहित पक्षी दिसत नसल्याबद्दल स्थानिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र उजनी जलाशयातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पक्ष्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे पक्षी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

संतोष पानसरे हे उजनी जलाशय परिसरात येणाऱ्या पर्यटकांना रोहित पक्ष्यांचे थवे दाखविण्याचे काम करतात. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे ते परवानाधारक मार्गदर्शक आहेत. पानसरे म्हणाले, दरवर्षी या सुमारास काही हजार रोहित पक्षी उजनीच्या परिसरातील गावांमध्ये दाखल होतात. गेल्या एक-दोन दिवसात रोहित पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असली तरी हजारोंच्या थव्यांची अद्यापही प्रतीक्षा आहे.

ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. सतीश पांडे म्हणाले, उजनी जलाशयात रोहित पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांची संख्या कमी आहे म्हणून त्यांचे आगमन लांबले असे म्हणता येणार नाही. यंदाच्या वर्षी मोसमी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने उजनी जलाशयाच्या पात्रात चांगला पाणीसाठा शिल्लक आहे ही सकारात्मक बाब आहे. पाण्याची पातळी कमी होते तशी रोहित पक्ष्यांसाठी योग्य अशी दलदलीची जागा उपलब्ध होते. अशी दलदल निर्माण होण्यास सुरुवात झाल्याने पक्ष्यांचे आगमन सुरु झाले आहे. मात्र रोहित पक्ष्यांच्या उजनीकडे येण्याच्या वाटेवरही अशा प्रकारच्या अनेक पाणथळ जागा उपलब्ध आहेत. तेथेही हे पक्षी जातात. त्या जागांमुळे रोहित पक्षी तेथेही दाखल होत आहेत.