पिंपरीतील राजीव गांधी वसाहतीमध्ये मंगळवारी रात्री गुंडांनी धुमाकूळ घालत सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. तसेच, दोन व्यक्तींवर हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरूनगर परिसरातील महिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीचा राग काढण्यासाठी गुंडांनी हा धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत लखन पवार (वय २६, रा. राजीव गांधी वसाहत, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आकाश शंकर लष्करे, अशोक पिराजी विटकर, हर्षल रामसर पवार, दिनेश माने, संदीप गवई, अशोक बनसोडे, किरण तांबे, उमेश सरवदे, संजय वाघमारे, दीपक मोहिते, मनोज वीटकर यांच्यासह पाच ते सहा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत राजेश सोरटे आणि ॠतिक सोरटे (रा. नेहरूनगर, पिंपरी) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर भागात गुंडांचा वापर असतो. त्यामुळे येथील महिलांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी पोलिसांकडे निवेदन दिले होते. यावर पोलीस उपायुक्तांनी कारवाई सूचना दिल्यामुळे काही गुंडांना पकडण्यात आले. हे आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर तक्रार केल्याचा राग मनात धरून मंगळवारी रात्री राजीव गांधीनगर वसाहतीत शिरले. त्यांनी दहशत माजवित वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन दुचाकी तर, चार मोटारींची तोडफोड केली. तसेच, दोन व्यक्तींवर हल्ला देखील केला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी काही जणांस ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद काळे हे अधिक तपास करीत आहेत.