आणीबाणीनंतरच्या काळात निवडणुकांमध्ये आम्ही सपाटून आपटत होतो. नंतर, पुन्हा काम करण्यासाठी उभे राहत होतो. संघाला असे दिवस येतील हे कोणी सांगितले असते तर विश्वासही ठेवला नसता, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

पुणे येथे गीता धर्म मंडळाच्या गीतादर्शन  मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होत. त्यांच्या हस्ते गीता संथा वर्गासाठी योगदान देणाऱ्या वसुधा पाळंदे यांना सरस्वतीबाई आपटे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेंहदळे, मुकुंद किडवेकर आणि मोरेश्वर जोशी उपस्थित होते.

भागवत म्हणाले, भारतीय व्यक्तीने जीवन कशाप्रकारे व्यतीत करावे याचे निर्देशन भगवद्गगीता करते. त्यामुळे गीतेचा अभ्यास आणि आचरण महत्वाचे आहे. त्यासाठी गीता सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जड वाटली तरी प्रयत्न सोडू नका. गीता घराघरापर्यंत पोहोचली, तर भारत आताच्या शंभरपट सामर्थ्यासह विश्वगुरु म्हणून पुढे येईल.

कर्तव्य उपस्थित झाल्यावर पाठ फिरवायची नाही हा गीतेचा पहिला पाठ आहे. लढायला नाही तर सत्ता संपादनासाठी नातलगांना मारायचे का, हा प्रश्न अर्जुनाला पडला होता. सज्जन समाजहिताचा विचार करतात. तर, दुर्जनांना स्वार्थ आणि तत्कालिक सुख दिसते. त्यामुळे हवे ते बिनदिक्कतपणे करतात. सुखाचा पाठलाग करताना आत डोकावण्याची बुद्धी आपल्या पुर्वजांना झाली. हा आतला शोध ज्यांनी जिकिरीने पूर्ण केला. त्यांना कधी दु:खाची बाधा झाली नाही. उपभोगापेक्षा त्याग आणि संयम महत्वाचा हे गीता शिकवते. गीतेनंतरच्या सर्व विचारधारांचे तत्व गीतेमध्ये सापडते.