पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपातील १९ नगरसेवक पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाकडून अपेक्षित पदं न मिळाल्यानं नगरसेवक नाराज असल्यानं पक्ष सोडणार बोललं जात असतानाच विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्तावर भाष्य केलं आहे.

२०२२ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे आतापासून स्थानिक राजकीय नेते कामाला लागले आहेत. असं असतानाच भाजपाचे १९ नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देऊन दुसरीकडे जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अचानक पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षावर नाराज असल्यानं भाजपा सोडण्याच्या विचारात हे नगरसेवक असल्याची चर्चा होत असून, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे.

“भाजप नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहेत. काहीतरी पुड्या सोडत असतात, चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. कोणीही भाजपा सोडून जात नाही, उलट पुढील काही दिवसात आमच्याकडे काही लोक येणार आहेत, असा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनीही भाजपाचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा केला आहे.

आणखी वाचा- अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

“पुण्यात भाजपाचे नगरसेवक चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. भाजपाच्या सत्ताकाळात पुण्यात विकास होत आहे. त्यामुळे येत्या २०२२ मधील पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा पुन्हा घौडदौड करेल. भाजपाने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला आहे. पुण्यात भाजपा-आरपीआयचे १०० हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील,” असा दावाही बापट यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.