स्थळ पुण्यापासून अवघ्या ७९ किलोमीटर अंतरावरचे. वेल्हे तालुक्यातील पासळी हे गाव. न्यू इंग्लिश स्कूल या गावातील शाळेत दररोज किमान चार ते दहा किलोमीटर अंतरावरून चालत येणारी मुले. या मुलांच्या शिक्षणाची खडतर ‘पाऊलवाट’ रूंद करण्याबरोबरच ग्रामविकासाचा ध्यास आशिष क्षीरसागर या युवकाने घेतला आहे. त्यांच्या मातोश्री या गावातच राहून मुलांसाठी नाश्ता आणि दोन्हीवेळचे जेवण बनवितात. एवढेच नव्हे तर मुलांना प्रेमाने खाऊ घालतात.

सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांतील पासळी गावात न्यू इंग्लिश स्कूल ही इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतची एकमेव शाळा आहे. या भागाला अठरा गाव मावळ असेही म्हणतात. तीनही इयत्तांतील प्रत्येकी ४० मुले दररोज किमान चार ते दहा किलोमीटर अंतर पार करून विद्यार्जनासाठी येतात. परिसरातील मार्गही असा खडतर की एक डोंगर उतरून दुसरा डोंगर चढण्यासारखा रस्ता. गावामध्ये एक एसटी बस दररोज रात्री येते आणि मुक्कामी थांबून सकाळी निघते. टमटम, वडाप, ट्रक किंवा शेअर रिक्षा असे दिवभरात प्रवासाचे कोणतेच साधन नाही. अभ्यास कसा करायचा या विषयावर वर्ग घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मी या गावी गेलो होतो. मुलांना शिकवण्यासाठी गेलो खरा. पण, माझेच प्रशिक्षण झाले, असे आशिष क्षीरसागर या युवकाने सांगितले. गावात महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, असे मुलांना विचारले. तेव्हा सुरुवातीला अडखळणारी मुले मग हळूहळू बोलू लागली. पिण्याचे पाणी नाही, वीज कधी तरी येते आणि वाहतुकीची समस्या तर किती बिकट हे सगळं जाणून घेतल्यानंतर त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छा झाली आणि त्यातूनच ‘पाऊलवाट फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली.

संगणक ही या मुलांसाठी दुर्मीळ गोष्ट आहे. दहावीच्या मुलांनी संगणक बघितलेला नाही तरी त्यांना या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवावी लागते. काहीही न समजता मुले पाठ करून उत्तरे लिहितात. अशा मुलांना दुसऱ्या महायुद्धाची पाच कारणे कशी देता येतील? जगाच्या नकाशावर ब्रिटन आणि जर्मनी कसे दाखविता येईल, हे प्रश्न मला भेडसावले. या प्रश्नांना सकारात्मक उत्तर देण्याच्या प्रयत्नांतून ‘पाऊलवाट फाउंडेशन’ ही संस्था स्थापन झाली. माझ्या या प्रयत्नांमध्ये घरातून आई शकुंतला क्षीरसागर यांनी भरभक्कम पाठिंबा दिला. दहा किलोमाटरपेक्षा दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेजवळच जागा घेऊन वसतिगृह उभारले आणि या मुलांच्या निवासाची सोय केली. माझी आई या गावातच राहून मुलांसाठी न्याहरी, दोन्ही वेळचे जेवण स्वत:  बनविते आणि मुलांना हौसेने खाऊ घालते. तेथील लोकांना गावातच रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. करवंदापासून जॅम बनविणे, हातसडीच्या तांदळावर प्रक्रिया, गोबर गॅसनिर्मिती येथपासून ते गावातील महिलांना विद्यार्थ्यांचे गणवेश आणि कपडे शिवण्यासाठीचे प्रशिक्षण अशा गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

या कामाविषयी आशिष क्षीरसागर म्हणाले, शाळेतील मुले-मुली हुशार आहेत. त्यांना योग्य साथ हवी आहे. नाही तर काय होते. शिक्षण अर्धवट ठेवून मुलींची शहरातील पुरुषांबरोबर लग्ने लावून दिली जातात. त्यांचे नवरे पुण्यात हॉटेलच्या फरश्या पुसण्यापासून ते हमाल किंवा माथाडी कामगार अशा स्वरूपाची कामे करून जेमतेम पैसे कमावतात. झोपडपट्टीत जागा मिळेल तिथे रहातात. लग्न होऊन आलेल्या त्या मुली संसाराला मदत म्हणून धुणी-भांडी काम करतात. नवऱ्याच्या व्यसनाने निर्माण होणाऱ्या प्रश्नांना तोंड देतात. गावातल्या मुला-मुलींनी शहरात जाण्यापेक्षा गावात राहूनच पैसे मिळविणे केव्हाही चांगले. त्यासाठी जूनमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करून गावातील युवकांना प्लंिबग, इलेक्ट्रिशियन, कपडे शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.