चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com

२५ ते २९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सारंग थिएटर फेस्टिव्हलमध्ये पुणेकर नाटय़प्रेमींना बहुभाषिक नाटकांची मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवात मराठी, हिंदी, तमीळ, हिंदी-ऊर्दू-इंग्रजी नाटके सादर होणार आहे.

गेले दशकभर ‘विनोद दोशी थिएटर फेस्टिव्हल’ या नावानं होणारा नाटय़ महोत्सव यंदा ‘सारंग थिएटर फेस्टिव्हल’ या नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. मराठी नाटकांचं प्राबल्य असलेल्या पुण्यात बहुभाषिक नाटकांची मेजवानी देणारा हा महत्त्वाचा महोत्सव. यंदाही या महोत्सवात पाच नाटकं होणार आहेत. त्यातील तीन नाटकं राष्ट्रीय स्तरावर आधीच प्रसिद्ध आहेत, तर दोन नाटकं या महोत्सवाद्वारे रंगभूमीवर दाखल होत आहेत.

रंगमंचावरचा सिनेमा म्हणता येईल अशा ‘डिटेक्टिव्ह ९-२-११’ या अतुल कुमार दिग्दर्शित नाटकानं २५ फेब्रुवारीला महोत्सवाचा पडदा उघडेल. द कंपनी थिएटर दिग्दर्शित या नाटकात ‘रेट्रो’ शैलीत रहस्यकथा अत्यंत वेगवान पद्धतीनं मांडण्यात आली आहे. एका संध्याकाळी ओपेरा हाउसजवळ गोळीबार होतो आणि नाटय़ाची एक विलक्षण मालिका सुरु होते. काहीही कल्पना नसलेला नायक त्यात ओढला जाऊन त्याच्यावर रहस्य उलगडण्याची जबाबदारी पडते. पुण्यातला युवा दिग्दर्शक सूरज पारसनीस त्याच्या ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या नाटकातून वेगळा प्रयोग करू पहात आहे. हे नाटक मनस्विनी लता रवींद्र, अभिराम जोशी, विराजस कुलकर्णी आणि ओंकार गोखले यांच्या कथा या नाटकात गुंफण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दूरच्या माणसांबरोबर संपर्क असतो, मात्र घराच्या भिंतीपलीकडे कोण राहातं हे माहीत नसतं. एकाच इमारतीतील चार व्यक्तींचं जगणं उलगडण्याचा प्रयत्न या नाटकात करण्यात आला आहे. थिएट्रॉन या संस्थेची निर्मिती असलेलं हे नाटक या महोत्सवातून रंगभूमीवर येत आहे.

पाँडिचेरीच्या इंडियनोस्ट्रम थिएटर प्रस्तुत ‘चांडाला – इम्प्युअर’ हे तमीळ नाटकही महोत्सवात सादर केलं जाईल. ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ची कथा भारतातील वर्णव्यवस्था, जातीभेद या पाश्र्वभूमीवर  भारतीय रुपात रंगमंचावर आणण्यात आली आहे. कुमरन वलावन यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलं आहे. आसक्त या संस्थेने ‘चहेता’ या नाटकाची निर्मिती केली आहे. मोहित टाकळकरने त्याचं दिग्दर्शन केलं आहे. यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मामध्ये उल्लेख असलेल्या अब्राहम किंवा  इब्राहिमची गोष्ट आहे. मात्र, ‘चहेता’मध्ये डोंगरावर इब्राहिमच्या मुलाच्या बाबतीत घडलेल्या त्या जीवघेण्या प्रसंगामुळे मुलावर झालेल्या मानसिक आघातांचा शोध घेण्यात आला आहे. मूळ इस्रायली नाटकाचं शिरीन बिस्मिल्लाह यांनी रुपांतर केलं आहे. एक प्रकारच्या हिंसात्मक अमूर्ततेतून आणि थोडय़ा विसंगतीतून हे नाटक कल्पनेपलीकडचं दर्शन घडवतं. सुनील शानबाग दिग्दर्शित ‘दीवार’ या गाजलेल्या नाटकानं महोत्सवाचा समारोप होईल. पृथ्वीराज कपूर यांनी केलेलं हे नाटक जवळपास ४५ वर्षांनी रंगमंचावर आलं आहे. दोघे जहागीरदार भाऊ आनंदानं राज्य करत असताना त्यांच्याकडे आलेल्या विदेशी पाहुण्यांमुळे त्यांच्यात कसं वितुष्ट निर्माण होतं आणि जहागीर विभागली जाते याची कथा नाटकात आहे. नव्याने हे नाटक रंगभूमीवर आणताना त्याला समकालीन संदर्भाची जोड देण्यात आली आहे.  भारतीय रंगभूमीच्या परिप्रेक्षात काय घडतं आहे, याचा किमान अंदाज या महोत्सवात येईल. वेगवेगळ्या काळातल्या गोष्टी, त्यांना असलेले समकालीन संदर्भ, नाटय़मय आणि प्रयोगशील मांडणी, रंगमंचीय शक्यतांचा घेतलेला शोध, रूपकात्मक आणि मनोरंजक अशा वैशिष्टय़ांमुळे ही नाटकं न चुकवण्यासारखी आहेत.