‘बीआरटी’तील त्रुटी रोखण्यासाठी आता आयआयटीच्या तज्ज्ञांचा सल्ला

पुणे : सातारा रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत असल्यामुळे जलद गती बससेवेअंतर्गत (बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी) या रस्त्याच्या पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आलेले असतानाच आता बीआरटी मार्गात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा सल्ला आयआयटीचे तज्ज्ञ महापालिकेला देणार आहेत. पवई आयआयटीकडून या रस्त्याचे सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडीट) करण्यात येणार असून त्यासाठी १६ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

पुणे-सातारा रस्त्यावर सन २००६-०७ मध्ये बीआरटी रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मार्गावर बीआरटी योजना सुरू झाल्यानंतर अपघातांचे वाढलेले प्रमाण आणि सातत्याने होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे बीआरटी मार्गावर विविध प्रयोग करण्यात आले. त्याअंतर्गत बीआरटी मार्गाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची कामे गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहेत.

स्वारगेट येथील जेधे चौक ते लक्ष्मीनारायण हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असल्यामुळे तो वगळून एकूण ५.४ किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गात काही सुधारणा करण्यात येणार आहेत. सेवा रस्ता, पदपथ, सायकल मार्गाचे विकसन ही कामे या मार्गावर होणार आहेत. स्वारगेट चौक ते कात्रज चौकापर्यंत हे काम होणार आहे. सध्या हे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही कामे मार्च अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र या कामांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नयेत, प्रवाशांच्या सोईसाठी काही ठोस उपाययोजना व्हाव्यात, तांत्रिक सल्ला मिळावा आणि अचूक तसेच जलदगतीने कामे व्हावीत, यासाठी आयआयटी पवई येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

‘नगर रस्ता आणि आळंदी रस्ता बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे लेखापरीक्षण होणार आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर लेखापरीक्षण करण्याऐवजी कामे सुरू असतानाच ते केल्यास त्याचा फायदा होईल. झेब्रा क्रॉसिंग, बसथांबे, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, सिग्नल, पदपथांचे विकसन अशा कामांबाबत आयआयटीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. काम चालू असताना आणि ते पूर्ण झाल्यानंतर अशा दोन टप्प्यात कामांची तपासणी होणार आहे. त्यासाठीची रक्कमही टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे,’ असे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता विजय शिंदे यांनी सांगितले.

अतिक्रमणांचा विळखा

सातारा रस्त्यावरील पदपथ आणि सेवा रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्याचे प्रकार सर्रास वाढत आहेत. त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून बीआरटी पुनर्रचनेची कामेही अर्धवट असल्यामुळे बीआरटी मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीबाबत येथे गोंधळाची परिस्थिती आहे. पदपथ आणि सायकल मार्गाची कामे होणार असल्यामुळे प्रस्तावित पदपथांनाही अतिक्रमणांचा विळखा पडण्याची शक्यता आहे.

बीआरटी मार्गावर उधळपट्टी

बीआरटी मार्गाची उभारणी शंभर कोटी रुपये खर्च करून करण्यात आली. त्यानंतर बारा वर्षांनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याची उपरती प्रशासनाला झाली. त्यामुळे पुनर्रचनेसाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या ही कामे सुरू आहेत. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी पदपथांचे विकसन आणि सायकल मार्ग तयार करण्यासाठी पुन्हा २३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. सातारा बीआरटी मार्गाची रखडलेली कामे आणि त्यावर होत असलेली उधळपट्टी तसेच वाढत्या खर्चामुळे प्रशासनावर सातत्याने टीका होत आहे.