सरकारी मदतीशिवाय विश्व साहित्य संमेलन घेऊ शकता का, याची माहिती द्यावी अशी विचारणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. संमेलनासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळवून देण्याची हमी घेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्याने समन्वयकपदी आपली नियुक्ती करण्याची मागणी संयोजकांकडे केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
विश्व साहित्य संमेलनासाठी लंडन येथील महाराष्ट्र मंडळाकडून निमंत्रण आले आहे. मात्र, राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर हे संमेलन घेऊ नये असा मतप्रवाह आहे. यासंदर्भात साहित्य महामंडळाची २५ मे रोजी पुण्यामध्ये बैठक होत असून, त्यामध्ये याविषयीचा अंतिम निर्णय होणार आहे. त्यापूर्वी ‘मसाप’ कार्यकारिणी सदस्याने केलेल्या ‘उद्योगा’ला साहित्य महामंडळाने चाप लावला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचा दांडगा अनुभव असलेल्या मसाप कार्यकारिणीच्या या सदस्याने नुकताच इंग्लड दौरा केला. त्यामध्ये लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. विश्व साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन देत संमेलनाचे समन्वयक म्हणून आपली नियुक्ती करण्याचा प्रस्ताव या सदस्याने महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवला. त्यानुसार विश्व साहित्य संमेलनाचे महाराष्ट्रातील समन्वयक म्हणून या सदस्याची नियुक्ती करीत असल्याचा ई-मेल मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार यांनी साहित्य महामंडळाकडे पाठविला.
साहित्य महामंडळाच्या गोवा येथे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्या वेळी अशा स्वरूपाचा ई-मेल आला असल्याची माहिती महामंडळाच्या माजी अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी दिली. त्यानंतर पुण्यामध्ये झालेल्या महामंडळाच्या मार्गदर्शन समितीच्या बैठकीमध्ये या ई-मेलला उत्तर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सरकारी मदतीशिवाय विश्व साहित्य संमेलनाचे संयोजन करण्याची आर्थिक ताकद आहे का हे कळवावे, असे महाराष्ट्र मंडळाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आता महाराष्ट्र मंडळाकडून उत्तर आल्यानंतर २५ मे रोजी साहित्य महामंडळ विश्व साहित्य संमेलनाच्या भवितव्याविषयीचा निर्णय घेणार आहे.