मी वाचकांना गृहीत धरत नाही. माझ्याबरोबरच वाचकांनीही विचार करावा, अशी माझी अपेक्षा असते. मी जो विचार करते असाच विचार माझ्या कथेतील व्यक्तिरेखाही करतात. जाणून घेण्याची अधिरता असल्यामुळे बधिरपणाने जगणे मला मान्य नाही, असे प्रसिद्ध लेखिका सानिया यांनी रविवारी सांगितले.
आयाम क्रिएशन्स, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित आयाम चित्रपट महोत्सवांतर्गत ‘राजहंस प्रकाशन’तर्फे सानिया यांच्या १५ कथांचा समावेश असलेल्या ‘संपादित सानिया’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध कथालेखक मििलद बोकील यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने डॉ. रेखा इनामदार-साने आणि डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सानिया यांच्याशी संवाद साधला. आयामच्या मनस्विनी प्रभुणे आणि आशयचे सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.
सानिया म्हणाल्या,‘‘आपण विचार कसा करतो आणि लेखनातून बंध कसे उलगडतो हे महत्त्वाचे असते. ती अभिव्यक्ती करण्याचे भाषा हे माध्यम आहे. ही अभिप्रेतता माझ्या आयुष्यात आणि लेखनात आहे. जगण्यामध्ये आणि आकलनामध्ये झालेला बदल लेखनातून उमटतो. २० व्या वर्षी झालेले आकलन आणि ४० व्या वर्षीचे आकलन यामध्ये प्रगल्भता निश्चित असते. स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्तीची कथा कदाचित मांडली नसेन, पण सत्तरीच्या दशकातील स्त्रीवादी चळवळीचा परिणाम लेखनावर झाला. विविध ठिकाणी झालेले शिक्षण आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये भेटलेली माणसे लेखनामध्ये सामग्री देत राहिली. लेखकांना लिहिते ठेवणारे श्री. पु. भागवत यांच्यासारख्या संपादकाने लेखनातील कोपरा उजळून निघाला.’’
‘‘माणसं, नातं, त्यांच्यातील ताण हा पट समोर दिसतो. ही पात्रं नंतर रुप घेऊन मार्ग निवडतात. कथालेखन हे एकटाकी झाले. मात्र, कादंबरी लेखनामध्ये काहीवेळा बदल करावे लागले,’’ असे सांगून सानिया म्हणाल्या, ‘‘इंटरनेट, फेसबुक, ई-बुक अशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नवी माध्यमे उपलब्ध झाली असून तरुणाई त्यातून आपल्या कल्पना पोहोचवत आहे. या अभिव्यकीला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने चित्रपटावर किंवा पुस्तकावर बंदी आता कोणी आणू शकणार नाही.’’
‘वळण’ या सानिया यांच्या  पहिल्याच कथेचे जी. ए. कुलकर्णी यांनी कौतुक केले होते, असे सांगून मििलद बोकील म्हणाले,की जात, धर्म, प्रांतभेदाला झुगारून देत आपली ओळख ही आत्मिक व्यक्तित्वाची असावी हीच सानिया यांची भूमिका आहे. त्यांची कथा मध्यमवर्गीय शहरी स्त्रीची नाही, तर वैश्विक संदर्भाचे भान असलेल्या भारतीय स्त्रीची कथा आहे. न्यायतत्त्वाच्या उद्घोषामुळे सानिया यांच्या लेखनाला उंची प्राप्त झाली आहे.’’
जयश्री बोकील यांनी सूत्रसंचालन केले. प्राची बारी यांनी आभार मानले.