लिपिक टंकलेखन परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेतील लिपिक-टंकलेखन पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात सांगलीतील विजय लाड यांनी राज्यात आणि मागासवर्गीयातून पहिला क्रमांक मिळवला आहे. तर अमरावतीच्या प्राजक्ता चौधरी महिलांमध्ये पहिल्या आल्या आहेत.

आयोगाने ६ आणि १० ऑक्टोबर २०१९ रोजी लिपिक-टंकलेखन (मराठी आणि इंग्रजी) या संवर्गातील एकूण १७९ पदांसाठी ही परीक्षा घेतली होती. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांकडून निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आयोगाने संके तस्थळावर निकाल जाहीर के ला.

परीक्षेसाठी संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेले दावे निकालासाठी विचारात घेऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे. अपंगासाठीच्या राखीव पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अधीन राहून त्यांची शिफारस करण्यात येत आहे. तसेच खेळाडू असल्याचा दावा केलेल्या उमेदवारांनी संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे अनिवार्य आहे. या परीक्षेच्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट के ले आहे.