सायली पोंक्षे, गौतमी भोर यांचे संशोधन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्याची समस्या, त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांवर मार्ग काढणारे संशोधन सायली पोंक्षे आणि गौतमी भोर या पुणेकर तरुणींनी केले आहे. या दोघींनी सॅनिटरी नॅपकिनची घरच्या घरी विल्हेवाट लावता येण्याजोगे यंत्र विकसित केले असून, त्यांच्या या संशोधनाची दखल इटलीतील रोम येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत घेण्यात आली.

सॅनिटरी नॅपकिनची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याबाबत सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. सॅनिटरी नॅपकिन्समुळे पर्यावरणाची हानी होते. सॅनिटरी नॅपकिन कचऱ्यात किंवा पाण्यात फेकले जातात. भारतातील एकूण कचऱ्यापैकी जवळपास दहा हजार टन कचरा सॅनिटरी नॅपकिनचा असतो. सॅनिटरी नॅपकिन्स वेगळे ठेवण्याचे आवाहन करूनही ते अन्य कचऱ्यात टाकले जात असल्याने कचरावेचकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, सायली आणि गौतमी यांनी दाहिनी हे सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणारे यंत्र विकसित केले आहे. सायली आणि गौतमी या दोघीही अभियंत्या आहेत. सायलीने एक वर्ष नामांकित आयटी कंपनीत काम केल्यानंतर नोकरी सोडून उद्योजक रवींद्र गद्रे यांच्यासह ‘ग्रीन अर्थ इक्विपमेंट’ ही कंपनी स्थापन केली.

गेल्या वर्षभरातील संशोधनातून तयार झालेल्या दाहिनी या यंत्रात सॅनिटरी नॅपकिन जाळले जातात. मात्र, त्यातून उत्सर्जन होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइडसारख्या वायूंचे प्रमाण अत्यल्प आहे. सॅनिटरी नॅपकिन जाळल्यानंतर त्यांची राख होते. ही राख झाडांना खत म्हणूनही वापरता येते. या यंत्राच्या निर्मितीसाठी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च आला. या यंत्राला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेण्यात आले आहे, असे सायली पोंक्षे यांनी सांगितले.

महिलांसाठीच्या स्वच्छतागृहात, घरोघरी, सोसायटय़ांमध्ये हे यंत्र बसवल्यास सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच कचऱ्याची निर्मिती कमी होईल, आरोग्याच्या समस्याही कमी होतील. हे यंत्र छोटय़ा आकाराचे असल्याने अडचणही होणार नाही.

– सायली पोंक्षे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitary napkins disposal tool developed
First published on: 20-09-2018 at 02:59 IST