संजय काकडे यांची उमेदवारीसाठी धावाधाव

भारतीय जनता पक्षाकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्यानंतर राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसमध्येही उमेदवारीला विरोध होत आहे हे लक्षात आल्यानंतर धावाधाव करत काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसकडे आणि भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची अशी चर्चा या भेटीबाबत राजकीय वर्तुळात होत आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यसभेतील खासदार संजय काकडे इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता त्यांनी सातत्याने व्यक्त केली होती. मात्र भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर काकडे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र लोकसभेसाठी पक्षाच्या बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी नको, निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या, अशी एकमुखी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेस ज्याला उमेदवारी देईल, त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पवार यांनी काकडे यांना या भेटीत सांगितले.

या भेटीनंतर काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शहर भारतीय जनता पक्षाने माझा केवळ वापर करून घेतला. माझ्या कोणत्याही समर्थकांना योग्य संधी दिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मी तक्रार केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. फडणवीस हे मला भावासारखे होते. मात्र भावाने लाथ मारल्यानंतर दुसरे घर शोधण्याशिवाय मला पर्याय राहिलेला नाही.