संस्कृत-तिबेटी परस्पर सहकार्य

बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित ‘बौद्ध तंत्र मार्ग’ या विषयावर संस्कृत आणि तिबेटी यांच्या परस्पर सहकार्यातून या दोन्ही भाषांतून ग्रंथनिर्मितीचे काम सुरू आहे. कोलंबिया विश्वविद्यालयातील बौद्ध आणि तिबेटन विद्या शाखेचे प्रा. रॉबर्ट थर्मन यांनी तिबेटन भाषेत आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी संस्कृत भाषेमध्ये ग्रंथनिर्मितीचे शिवधनुष्य पेलले आहे.

हिंदू, बौद्ध आणि जैन हे तांत्रिक संप्रदाय आहेत. या संप्रदायाच्या साधना या गुह्य़ स्वरूपाच्या असतात. साधनेचे मार्ग क्लिष्ट असून केवळ ग्रंथ वाचून समजेल अशी परिस्थिती नाही. बौद्ध संप्रदायातील साधनेला वज्रयान किंवा मंत्रयान संबोधिले जाते. चौथ्या-पाचव्या शतकापासून सुरू झालेला संप्रदाय बाराव्या शतकामध्ये विस्तारला. भारतामध्ये उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने संप्रदायाची व्याप्ती मोठी होती. या संप्रदायाच्या विविध देवता असून बुद्ध बोधिसत्व ही मुख्य मूर्ती आहे, अशी माहिती डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली.

संस्कृत आणि धर्म इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी हे काम करीत आहे, असे सांगून बहुलकर म्हणाले, बौद्ध तत्त्वज्ञानाचे संस्कृत आणि बौद्ध संस्कृतमध्ये ग्रंथ आहेत. त्यामध्ये ‘गुह्य़ समाज’ हा तंत्र मार्गावरील प्राचीन ग्रंथ आहे. त्याची एकच टीका तिबेटन भाषेमध्ये असून त्याचा चिनी भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. या ग्रंथाच्या आधारे तंत्र मार्गाचा अभ्यास केला जातो. तांत्रिक साधनेवर नैतिक आचरण कसे करावे यासंबंधी बौद्ध धर्मगुरू लामा प्रवचन देतात. जगात अनेक ठिकाणी संप्रदायाचा अभ्यास केला जातो. ज्येष्ठ अभ्यासक राहुल सांकृत्यायन यांनी तिबेटन भाषेतील या टीकेची छायाचित्रे घेतली होती. हा ठेवा पाटणा येथील बिहार रिसर्च सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या टीकेचा आधार घेत अनेक बौद्ध विहारांमध्ये अभ्यास केला जातो. अशा दुर्लभ ग्रंथासह संस्कृत, तिबेटन संस्करणांचा आणि पोथ्यांचा अभ्यास करणाऱ्या सारनाथ येथील विभागामध्ये मी काम केले आहे. आठव्या शतकातील आचार्य चंद्रकीर्ती यांचा ‘प्रदीपोद्योतन टीका’ हा बौद्ध तंत्र संप्रदायातील अर्थनिर्धारणशास्त्र (हर्मेन्युटिक्स) विषयातील महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. त्याचाही आधार ‘बौद्ध तंत्र मार्ग’साठी घेण्यात आला आहे.