‘विनोद दोशी थिएटर फेस्टिव्हल’च्या नावात बदल

पुणेकर नाटय़प्रेमींना गेली दहा वर्षे बहुभाषक नाटकांची मेजवानी देणाऱ्या विनोद दोशी नाटय़ महोत्सवाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता हा महोत्सव ‘सारंग थिएटर फेस्टिव्हल’ या नावाने ओळखला जाणार असून, यंदाचा महोत्सव २५ फेब्रुवारीपासून रंगणार आहे.

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नाटककार प्रा. सतीश आळेकर, परिमल चौधरी, दिग्दर्शक अतुल कुमार, मोहित टाकळकर, सूरज पारसनीस या वेळी उपस्थित होते. ‘डिटेक्टिव्ह ९-२-११’, ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’, ‘चंडेला इम्प्युअर’, ‘चहेता’ आणि ‘दीवार’ ही हिंदी-इंग्रजी, मराठी, तमीळ, हिंदोस्तानी भाषेतील नाटके महोत्सवात सादर होतील.

‘महोत्सवातील नाटकांमधून समकालीन भारतीय रंगभूमीचे दर्शन घडते. विविध भाषा, संस्कृती, जाणिवा या नाटकांतून अनुभवायला मिळतात. यंदाही अशीच वैविध्यपूर्ण आणि तीन पिढय़ातील रंगकर्मीची नाटके पाहायला मिळतील,’ असे आळेकर म्हणाले. यंदाच्या महोत्सवासाठी परिमल आणि प्रमोद चौधरी यांनी विशेष सहकार्य केले आहे.

गिरीश कर्नाड यांनी नाव सुचविले!

यंदा महोत्सवाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नवे नाव काय असावे असा विचार सुरू होता. त्यासाठी ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाड यांनी सुचवलेले ‘सारंग थिएटर फेस्टिव्हल’ हे नाव यथोचित आहे. त्यात प्रतिष्ठानच्या नावातील साहित्य आणि रंगभूमी यांचीही सांगड आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.