21 February 2020

News Flash

दिग्दर्शकाकडे तीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंच व तिच्या मुलास अटक

एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या परवानगीसाठी दिग्दर्शकाकडून अॅम्बी व्हॉलीतील आंबवणे गावच्या सरपंच व त्यांच्या मुलास तीस हजार रुपायंची लाच घेताना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर लोणावळा

| December 27, 2014 02:35 am

एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या परवानगीसाठी दिग्दर्शकाकडून अॅम्बी व्हॉलीतील आंबवणे गावच्या सरपंच व त्यांच्या मुलास तीस हजार रुपायंची लाच घेताना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच नीता नामदेव खोंडगे व त्यांचा मुलगा जुलेश नामदेव खोंडगे (वय २३, रा. आंबवणे, ता. लोणावळा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत दिग्दर्शक आकाश राम जोशी (वय ३४, रा. भांगराडी, ता. मावळ) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोशी यांना एका जाहिरातीचे चित्रीकरण अॅम्बी व्हॅलीतील आंबवणे गाावच्या हद्दीत करायचे होते. त्यासाठी त्यांनी वनविभाग व इतरांची परवानगी घेतली होती. मात्र, आंबवणे गावच्या सरपंच असलेल्या नीता यांच्या मुलाने चित्रीकरण करण्यास परवानगीसाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास चित्रीकरण करू देणार नसल्याचेही धमकावले. याबाबत जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. जोशी हे खोंडगे याच्याशी तडजोड करीत होते. शेवटी तीस हजार रुपये घेण्याचे त्याने मान्य केले. लाचेच्या मागणीची सर्व खात्री
केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोडे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी खंडाळा येथील हॉटेल डय़ूक्स रिसॉर्ट या ठिकाणी सापळा रचला.
 नीता यांच्या वतीने जुलेश याला तीस हजार रुपयांची लाच घेताना पकडले. नीता यांनी पुढील चित्रीकरणासाठीची रक्कम कधी देणार अशी विचारणा फोनवरून केली असून ते ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. शासकीय लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ व   ०२०-२६१२२१३४, ३६१३२८०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी केले आहे.

First Published on December 27, 2014 2:35 am

Web Title: sarpanch arrested in bribe
टॅग Bribe
Next Stories
1 माजी महापौर राजपाल यांच्या मुलासह दोघांना अटक
2 नववर्ष स्वागताच्या वेळी स्पीकर, गोंगाटावर लक्ष ठेवा
3 मराठय़ांच्या इंग्रजांवरील विजयाच्या आठवणी ताज्या होणार
X