अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ससूनमधील ‘कॅथलॅब’च्या नूतनीकरणाला मुहूर्त लागला आहे. जून २०१३ पासून बंद अवस्थेत असणारी कॅथलॅब सध्या रिकामी करण्यात आली असून पुढील आठवडय़ापासून तिच्या नूतनीकरणास सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे.
सध्या कॅथलॅब बंद असल्यामुळे रुग्णालयातील ‘अँजिओग्राफी’ आणि ‘अँजिओप्लास्टी’ही बंद आहेत. ती सुरू झाल्यास अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करून घ्यायला सांगितलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकेल. रुग्णालय व्यवस्थापनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
सध्या ससूनमध्ये हृदयावरील ‘टू-डी इको’ आणि ‘स्ट्रेस टेस्ट’ या चाचण्या केल्या जातात. हृदयशस्त्रकियांसाठी असलेला ‘कार्डिओ व्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी’ (सीव्हीटीएस) हा विभागही सुरू असून तिथे ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी आणि हृदयाचा वॉल्व्ह बदलण्यासारख्या शस्त्रक्रिया होतात. कॅथलॅबचे नूतनीकरण झाल्यानंतर कॅथलॅब आणि सीव्हीटीएस विभाग मिळून अँजिओप्लास्टी, हृदयातील दोष दूर करण्यासाठीच्या शस्त्रक्रिया, पेसमेकर बसवण्याची शस्त्रक्रिया, हृदयाचा वॉल्व्ह बारीक झाला असल्यास ‘बलून वॉल्व्होप्लास्टी’ या शस्त्रक्रियाही होऊ शकतील.
‘कार्डिअॅक केअर युनिट’, कॅथलॅब आणि हृदयरोगविभाग या तिन्हीच्या नूतनीकरणासाठी ससूनला ७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून कॅथलॅब मशीन, इन्ट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड मशीन अशा अद्ययावत उपकरणांच्या खरेदीबरोबरच व्हेंटिलेटर, मॉनिटर अशा यंत्रणांची सोय असलेल्या ६ खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या कामाचाही समावेश आहे.