काही मागण्या मान्य झाल्याने निर्णय

पुणे :  बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत आंदोलन सोमवार (१९ एप्रिल) पर्यंत स्थगित करत असल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सच्या (मार्ड) ससून शाखेकडून देण्यात आली आहे. रुग्णालयातील करोना रुग्णांच्या खाटा वाढवण्यापूर्वी रुग्णालयाने मनुष्यबळ वाढवून निवासी डॉक्टरांवरील ताण कमी करावा या मागणीसाठी मार्डने शुक्रवारी संध्याकाळपासून आंदोलन सुरु के ले आणि अत्यावश्यक वगळता सर्व सेवा बंद के ल्या. मात्र, काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे हे आंदोलन सोमवापर्यंत स्थगित करत असल्याचे मार्डने स्पष्ट के ले.

ससून रुग्णालयाच्या करोना विभागात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांवर मागील वर्षीपासून निवासी डॉक्टर उपचार करत आहेत. मात्र, या आणीबाणीच्या परिस्थितीत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने निवासी डॉक्टरांवरही रुग्णसेवेचा ताण येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर ससूनमधील करोना रुग्णांच्या खाटा वाढवण्यापूर्वी त्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध करुन द्या, अशी मागणी करत मार्डने अत्यावश्यक वगळता इतर वैद्यकीय सेवा न देण्याची भूमिका शुक्रवारी घेतली. करोना रुग्णांवरील उपचार, प्रसूती आणि अत्यावश्यक रुग्णसेवा वगळता इतर सर्व विभागातील काम बंद करण्याचा निर्णय मार्डच्या सदस्य डॉक्टरांनी घेतला. मात्र, शनिवारी झालेल्या बैठकीत काही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मार्डच्या ससून शाखेचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, अधिष्ठात्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात करोना वॉर्डातील रुग्णसेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांची संख्या वाढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या असलेली रुग्णसेवेची जबाबदारी वाटून घेण्यासाठी ६० वैद्यकीय अधिकारी नेमण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही अधिष्ठात्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सेवा पूर्ववत सुरू करत आहोत असेही डॉ. जामकर यांनी सांगितले. सोमवारी होणाऱ्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचेही मार्डने या वेळी स्पष्ट के ले.