माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणाचा तपास थांबवत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) न्यायालयात सादर करण्यात आला. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केल्यामुळे या हत्येमागे नक्की कोण होते, हे कायम अज्ञात राहणार असल्याची शक्यता आहे. सतीश शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० रोजी तळेगावमध्ये धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती.
सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास सुरुवातीला पुणे ग्रामीण पोलीस करीत होते. त्यांनी तळेगाव आणि मावळमधील काही संशयितांना अटक केली होती. मात्र, सबळ पुराव्यांअभावी नंतर त्यांची सुटका करण्यात आली. हत्येच्या एक वर्षानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. देशभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या हत्येचा तपास करण्यासाठी दबाव आणल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा असलेली सरकारी जमीन परस्पर खरेदी विक्री केल्याचे व्यवहार सतीश शेट्टी यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असताना त्यांना धमकावणारे अनेक फोन आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.