देशातील शेतकऱ्यांच्या शेतीपुढील आव्हाने वेळीच ओळखून त्यावर सातत्याने उपाययोजना आखून शेतकऱ्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे शरद पवार शेतकऱ्यांचे खरे तारणहार ठरले आहेत. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले की भूमिपुत्रांना आठवण होते ती पवार साहेबांची. मग अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असो की, दुष्काळी परिस्थितीने शेत पिके जळालेली असोत. शेताच्या शिवारात बांधाबांधावर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर पोहोचतात ते पवार साहेब.

शेतीत राबणारे अनेक शेतकरी उद्योजक झाले. शेतीला फायदेशीर म्हणून दुग्ध व्यवसाय वाढीला पवार यांनी चालना दिली. दुग्ध व्यवसायात सुसूत्रता आणून दुग्धजन्य पदार्थ व त्यावरील प्रक्रिया उद्योग त्याच शिवारात वाढवून भूमिपुत्रांच्या सुशिक्षित मुलांच्या हाताला रोजगार निर्माण करून देताना दुग्धजन्य पदार्थाना त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली.

अतिरिक्त उसाच्या उत्पादन काळात शेतकऱ्याच्या उसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत त्यांनी साखर कारखाने सुरू ठेवले, तर वेळप्रसंगी ऊ स वाहतुकीसाठी सरकारी वाहने शेतकऱ्याच्या बांधावर नेऊ न त्यांना दिलासा दिला. ऊ स शेतीपूरक उद्योगांना अडचणीचे ठरणारे अडथळे त्यांनी पार केले. म्हणूनच आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गूळ कारखाने उभे राहिले. पवारांनी शेतीपूरक उद्योगांना केवळ प्रोत्साहन देऊ न अनेक उद्योग उभे तर केलेच, परंतु त्या उद्योगांची वेळोवेळी परिस्थिती व त्यामध्ये कराव्या लागणाऱ्या सुधारणाबाबत तिथे प्रत्यक्ष जाऊ न मार्गदर्शनही केले.

फळबागा लागवडीसाठी ते सातत्याने आग्रही राहिले. फळ प्रक्रिया उद्योगांची निर्मिती करून त्यावर दूरदृष्टीने अभ्यास करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी काही संस्था उभ्या केल्या. पवारांच्या कल्पनेतल्या शेतीविकासाची काही स्वप्न साकार झाली. शेतकऱ्यांपासून उद्योगपतीपर्यंत आणि समाजातील दीनदुबळ्यापासून कष्टकऱ्यापर्यंत नानाविध क्षेत्रात विखुरलेल्या समाजमनाची स्पंदने जाणून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा वेध घेऊ न वेळेआधीच उपाय योजना करणारा द्रष्टा नेता म्हणून साहेबांकडे पाहिले जाते.

देशाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व कृषी पटलावर तळपणाऱ्या या तेजस्वी भूमिपुत्रास वाढदिवसाच्या निमित्ताने नव्हे तर, अखंडपणे कार्यकर्त्यांचे कर त्यांच्या चरणस्पर्शासाठी झुकतात ते याच कारणाने. समाजातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पवार साहेबांनी त्यांच्या हाताला दिलेले विविध क्षेत्रातील काम, मग ते शेती क्षेत्रातील असो, उद्योग व्यापार अथवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील असो. भविष्याचा आधार होत देशातील प्रत्येक घटक बलवान करण्याचा त्यांचा ध्यास दिसून येतो.  अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

योद्धा

आज १२ डिसेंबर, आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस. सर्वप्रथम साहेबांना तमाम बारामतीकरांच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. खरं तर बारा बारा तारीख महिना एकच असला तरी या वाढदिवशी २०१९ ची बेरीजही १२ येत आहे. म्हणून खरोखर साहेब भाग्यवान आहेत अन् नेमका याच वर्षी तीन पक्षांना एकत्र करत महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा दुर्मीळ योग त्यांनी साधला आहे, याचा अभिमान वाटतो. महाराष्ट्राचे चाणक्य, किंगमेकर अशा कोणत्याही उपमा पवारांना कमीच पडतील अशी वाटचाल सुरू आहे.

पक्षाचे एकएक आमदार साथ सोडून जाताना अजिबात व्यथित न होता स्वत:च्या खांद्यावर धुरा घेत ७९ वर्षांचा हा योध्दा पक्षास चांगले यश मिळवून सत्तेपर्यंत पोहोचवतो हे अभिमानास्पद आहे.

पवारांचा संपर्कच एवढा आहे की ते कोणतेही अशक्यप्राय काम करून दाखवू शकतात. राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देऊन राजकारण केल्यावर स्वत:बद्दलही गैरसमज वाढतील या हेतूने पवारांनी दिलेला नकार हा त्यांचा मुरब्बीपणा व चाणक्ष आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याची ओळख करून देणारा ठरतो. म्हणूनच अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा विशेष अभिमान वाटतो. आदरणीय प्रतिभाकाकींनाही यानिमित्ताने वाढदिवस (१३ डिसेंबर) शुभेच्छा. पती-पत्नीचा वाढदिवस एका दिवसाच्या अंतराने येणे खरोखर दुर्मीळ योगायोग आहे. तमाम बारामतीकर बंधू, भगिनींच्या वतीने मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! साहेब व काकींना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

 

-विनायक जाधव, शारदानगर, ता. बारामती (शब्दांकन- सुधीर जन्नू)

– विष्णूकुमार माने, इंदापूर (शब्दांकन – तानाजी काळे, पळसदेव)