सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अखेर आपल्या प्रथम सत्राच्या परीक्षा जवळपास एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम सत्राच्या परीक्षेवरुन निर्माण झालेला गोंधळ आता संपुष्टात आला आहे. विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलपासून घेण्याचे निश्चित झाले आहे. याचे सविस्तर वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर केले जाणार आहे.

यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा मार्च महिन्यात होणार होती. १५ मार्चपासून परीक्षा घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यापूर्वी झाला होता. मात्र, परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडीवरून मतभेद असल्याने महिन्याभरात निर्णय झाला नव्हता. त्यामुळे परीक्षेचे ठरलेले वेळापत्रक कोलमडून गेल्यामुळे मंगळवारी पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलपासून घेण्याचे निश्चित झाले.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून त्यात ५० गुणाचे बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू ) विचारले जातील. विद्यापीठाची स्वतःची एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी परीक्षा घेणार आहे. यापूर्वी निर्णयानुसार २० गुणांचे लेखी स्वरूपातील प्रश्न विचारले जाणार होते. तसेच या प्रश्नांची उत्तरे एका कागदावर लिहून त्या कागदाचा फोटो विद्यापीठाने दिलेल्या संकेत स्थळावर अपलोड करावा लागणार होता. परंतु,विद्यापीठाने २० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ५० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर केले जाणार आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षांबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम अखेर दूर झाला आहे.