संगीत संमेलनांमधून गायिकांना सामान्य रसिकांमध्येही प्रतिष्ठा

पुणे : अभिजात संगीतामध्ये आपल्या गायकीची स्वतंत्र नाममुद्रा उमटविणाऱ्या ज्येष्ठ गायिकांच्या प्रतिमा असलेल्या ‘स्वरनायिका’ या अनोख्या दिनदर्शिकेची निर्मिती प्रसिद्ध औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी केली आहे. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या पहिल्याच दिवशी  बुधवारी (११ डिसेंबर) ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या  हस्ते आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या उपस्थितीत या दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे.

पाकणीकर म्हणाले,की पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी गांधर्व महाविद्यालयातून स्त्रियांना संगीत शिक्षणाची दारे खुली केली आणि संगीतात नवे परिवर्तन सुरू झाले. गायिकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ  लागला. संगीत संमेलनांमधून गायिकांना सामान्य रसिकांमध्येही प्रतिष्ठा प्राप्त होऊ  लागली. तत्कालीन पारतंत्र्यात या स्वरज्योती अधिकारवाणीने प्रकाशित होऊ  लागल्या. पुढे रेकॉर्ड्स, तबकडय़ांचा जमाना आणि रेडिओद्वारे या गायिका घराघरात पोहोचल्या.

ज्या प्रतिभावंतांमुळे संगीतात बदल घडतात आणि संगीताचा उत्कर्ष होतो, म्हणजेच ज्यांच्यामुळं संगीत पुढे जाते त्यांना संगीतामध्ये ‘नायक’ असं म्हटलं जातं. गेल्या शतकभरात या गायिकांमुळे हिंदुस्थानी राग संगीताला नवी ऊर्जा मिळाली, रागसंगीताची एक नवी वाटचाल उत्कर्षांप्रत पोहोचली. म्हणून या गायिकांना आता ‘स्वरनायिका’ असे म्हटले पाहिजे. या स्वरनायिकांनी गेल्या शतकभरात राग संगीताचं नवं चरित्र आणि नवं चारित्र्य घडवले आहे. या दिनदर्शिकेवर सूरश्री केसकर, अंजनीबाई मालपेकर, गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, सिद्धेश्वरी देवी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल आणि गिरीजा देवी या स्वरनायिकांची प्रकाशचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. गळ्यात कॅमेरा घेऊन ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त मी प्रवेश केल्याला यंदा ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात जवळजवळ पाचशे गायक-वादकांच्या हजारो भावमुद्रा मला कॅमेराबद्ध करता आल्या. कलेच्या सादरीकरणात हरवून गेलेली ही कलावंत मंडळी जेव्हा आपल्या सादरीकरणात परमोच्च क्षण गाठतात, तो ‘निर्णायक’ क्षण टिपण्याची माझी सदैव धडपड राहिली. त्या सर्व कलाकारांच्या गायन-वादनाबरोबरच मला या निर्णायक क्षणांनीही अपरिमित आनंद दिला. आनंद सर्व संगीतप्रेमींमध्ये वाटून घेता यावा यासाठीच या दिनदर्शिकेची निर्मिती केली असल्याची माहिती पाकणीकर यांनी दिली. अनुनाद संस्थेने दिनदर्शिकेची मांडणी केली असून  दिशा ऑफसेट यांनी आर्ट पेपरवर छपाई केली आहे.