परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांबाबत उमेदवारांना कोणतीही शंका न राहण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाकडून परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, निकालासाठी गृहीत धरलेले एकूण गुण, उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गासाठीच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.

१ ऑक्टोबर २०२० नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, चाळणी परीक्षांसाठी हा निर्णय लागू असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने  निर्णयाची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ  बहुपर्यायी स्वरूपाच्या सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. त्यापैकी भाग एक (मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग दोन (कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवाराला असते. उमेदवाराने परीक्षेवेळी उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार, उत्तरपत्रिकेच्या मलपृष्ठावरील  सूचनांनानुसार नोंदवणे गरजेचे असते. उत्तरपत्रिकेच्या भाग दोनवरून उमेदवाराला त्याने संबंधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाने जाहीर केलेल्या उत्तरतालिके वरून पडताळता येतात. त्यामुळे उमेदवाराला प्राप्त होऊ शकणाऱ्या गुणांचा अंदाज येतो.

या पार्श्वभूमीवर उमेदवारांना त्यांनी संबंधित परीक्षेमध्ये मिळवलेले गुण अचूक कळण्यासाठी, गुणांबाबत कोणतीही शंका न राहण्यासाठी संबंधित परीक्षेचा निकाला जाहीर के ल्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण, उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवाराच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

पारदर्शकता हा आयोगाच्या कामकाजातील मुख्य गाभा आहे. त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी आयोगाकडून २००४ मध्ये उत्तरतालिका संके तस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २००७ पासून कार्बन बेस उत्तरपत्रिका वापरण्याचा पुरोगामी निर्णय झाला. त्यापुढील टप्पा म्हणजे अधिक पारदर्शकता राखण्यासाठी मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण, उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवाराला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

– सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी